नालासोपारा – नालासोपारा पूर्व येथील अग्रवाल नगरीतील डम्पिंग ग्राऊंड आणि एसटीपी प्लांटसाठी राखीव असलेल्या जमिनीवर उभारलेल्या ४१ बेकायदा इमारतींवर वसई-विरार महापालिकेने पोलिसांच्या मोठ्या बंदोबस्तात आजपासून तोडक कारवाई सुरू केली. ही कारवाई मुंबई हायकोर्टाच्या आदेशावरुन केली जात असल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
नालासोपारा पूर्वेकडील वसंत नगरी येथे सर्व्हे २२ ते ३० पर्यंत मोठा भूखंड होता. हा भूखंड वसई-विरार महापालिकेने डंपिंग ग्राऊंडसाठी आरक्षित ठेवला होता. या भागात वस्ती वाढल्यानंतर डंपिंग ग्राऊंडचे आरक्षण हटवून एसटीपी प्लांटसाठी तो आरक्षित केला होता. २००६ आधी बहुजन विकास आघाडीचे माजी नगरसेवक सीताराम गुप्ता आणि त्यांचे पुतणे अरुण गुप्ता या दोघांनी मिळून या जमिनीवर बेकायदेशीर इमारती बांधण्यास सुरुवात केली होती. २०१० ते २०१२ पर्यंत येथे चार मजल्यांच्या ४१ इमारती उभारण्यात आल्या. सीताराम गुप्ताने या सर्व इमारतींमधील फ्लॅट विकले. त्यानंतर या इमारतींमध्ये राहणाऱ्या ३ हजार कुटुंबीय राहत होते.