अलिबाग – अलिबाग तालुक्यातील नारंगीचे भारतीय सैन्यदलाच्या महार रेजिमेंटमधील हवालदार सुयोग अशोक कांबळे यांना सिक्कीममध्ये कर्तव्यावर असताना शहीद झाले होते. त्यांना लष्कराच्या वतीने मानवंदना देण्यासाठी काल एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. शहीद जवान सुयोग अशोक कांबळे यांना मानवंदना देण्यासाठी भारतीय लष्कराचे जवान हजर होते. तसेच हजारोंचा जनसमुदाय जमला होता. त्यावेळी शहीद जवान अमर रहेच्या घोषणांनी वातावरण भारावून गेले होते.
सुयोग कांबळे यांनी १८ वर्षे सैन्यदलात विविध पदांवर कर्तव्य बजावले. अनेक वर्षांपासून ते सिक्कीममध्ये होते. ४ ऑक्टोबर २०२३ रोजी ते कर्तव्यावर असताना अचानक धरणाचा बांध फुटून जवानांची पूर्ण तुकडी वाहून गेली. या दुर्घटनेनंतर त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न झाला. मात्र सुयोग कांबळे यांचा शोध लागला नाही. भारतीय लष्करी नियमाप्रमाणे सव्वा वर्षानंतर भारतीय जवान सुयोग अशोक कांबळे यांना शहीद घोषित करण्यात आले.