नागपूर – मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर नायलॉन मांजाचा धोका लक्षात घेऊन नागपूर पोलिसांनी शहरातील १४ उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद केले. पतंगसाठी वापरल्या जाणाऱ्या मांजामुळे आणि खास करून प्रतिबंधित नायलॉन मांजामुळे उड्डाण पुलावरील दुचाकी स्वार यांचा जीव धोक्यात येतो. परिणामी, अपघातांची शक्यता टाळण्यासाठी पोलिसांनी नागपूर शहरातील महत्वाचे उड्डाणपूल सकाळी ६ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत बंद ठेवले. यामध्ये शहीद गोवारी, सक्करदरा, मेहंदीबाग, पाचपावली, दिघोरी, कडबी चौक पूल-सदर, गोळीबार चौक-पाचपावली उड्डाणपूल, मानकापूर, दही बाजार, मनीषनगर, वाडी, पारडी आणि कावरापेठ पूल यांचा समावेश होता. उड्डाणपूल परिसरात वाहतूक पोलीस तैनात केले होते. तसेच शहरात प्रतिबंधित नायलॉन मांजाची विक्री होऊ नये आणि त्याचा कोणी वापर करू नये यासाठी नागपूर पोलिसांनी सर्वच पोलीस ठाण्यात विशेष पथक ही तयार केले. याशिवाय पोलीसांनी बाईकला सेफ्टी आर्च लावून बाहेर पडण्याचे आवाहन ही दुचाकी चालकांना केले.
नायलॉन मांजाचा धोक्यामुळे नागपूरात १४ उड्डाणपूल बंद
