अबुजा
नायजेरियामध्ये रविवारी प्रवाशांना घेऊन जाणारी बोट उलटून मोठी दुर्घटना घडली आहे. नायजेरियातील सेंट्रल नायजर राज्यातील मोकवा भागात ही घटना घडली आहे. यावेळी या बोटीतून १०० हून अधिक लोक प्रवास करत होते. त्यातील २६ जणांचा मृत्यू झाला आहे. अपघातातील ३० जणांना वाचवण्यात यश आले असून सुमारे ४४ जण अजूनही बेपत्ता आहेत. प्रशासनाकडून सध्या बचावकार्य अजूनही सुरू आहे.
या बोटीतून मोठ्या प्रमाणावर शेतकरी प्रवास करत होते. ते आपल्या शेतात जात होते. रविवारी घडलेल्या या दुर्घटनेत २६ जणांचा मृत्यू झाला. तर मृत्युमुखी पडलेल्या लोकांमध्ये बहुतांश महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे. नायजेरियाच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाच्या सहकार्याने सागरी पोलीस आणि स्थानिक पाणबुडे बेपत्ता लोकांचा शोध घेत आहेत. नायजेरियामधील हा दुसरी मोठी बोट दुर्घटना आहे. यापूर्वी जुलै महिन्यात बोट बुडाल्याने १०० जणांचा मृत्यू झाला होता.