छत्रपती संभाजीनगर – नाथसागर जलाशयात उडी मारून त्र्यंबक कडुबा धोत्रे महाराज (४७) या दिव्यांग शेतकऱ्याने आत्महत्या केली. ते कन्नड तालुक्यातील नेवपूर जहांगीर या गावाचे रहिवाशी आहेत. सरकार दिव्यांगाकडे दुर्लक्ष करत आहे. आमच्या कोणत्याच मागण्या मान्य होत नाहीत. अंपगत्वाशी लढा देत आता पर्यंत जगलो, मात्र आता मी जीवन संपवण्याचा निर्णय घेतला आहे, अशी त्र्यंबक धोत्रे याने आत्महत्यापूर्वी चिठ्ठी लिहिली होती. आत्महत्या पूर्वी त्याने समाज माध्यमात पोस्ट केली. सोबत एक ऑडिओ क्लीप त्याने जोडली होती. त्या ऑडिओ क्लीपमध्ये त्र्यंबक धोत्रे यांनी सरकारला विनंती केली की, थोड्याच वेळात मी माझे जीवन संपवत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना माझी विनंती आहे की, दिव्यांगांच्या आता तरी मागण्या मान्य करा.
चिठ्ठीत लिहिले की, छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रहार संघटनेच्या लक्षवेधी आंदोलनात सहभागी झालो. परंतु दिव्यांगांची कोणतीही मागणी महायुती सरकार मान्य करत नाही. दिव्यांगांना संपूर्ण कर्जमाफी मिळत नाही. आम्हाला घरकुल मिळत नाही. साध्या शौचालयाचे ही पैसे मिळत नाहीत. मी स्वतः सततचा पाऊस आणि नापिकीमुळे कर्ज फेडू शकत नाही. महायुती सरकारने दिव्यांगांच्या मागण्या मान्य करून त्यांना न्याय द्यावा.
त्र्यंबक धोत्रे यांची ऑडिओ क्लीप ‘ग्रामपंचायत नेवपूर जहांगीर’ या व्हाटस् ॲप ग्रुपवर आली. त्यानंतर नेवपूर जहांगीर या गावचे सरपंच मनोज देशमुख व माजी सरपंच भारत आवारे यांनी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र संपर्क होऊ शकला नाही. त्यांनी कन्नड पोलिसांना याबाबत माहिती दिली. पठाण आणि कन्नड पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली तेव्हा नाथसागर धरणाच्या भिंतीवर मोबाईल व चप्पल दिसून आले. नाथसागर जलाशयात त्र्यंबक धोत्रे यांचा मृतदेह रात्री आढळून आला.