सांगली
राज्यातील बसस्थानकांवर नाथजलाची १५ रुपयांची बाटली २० रुपयांना विकली जात असल्याचा प्रकार उघड झाला. विविध मार्गांवरील उपहारगृहांमध्ये ३० रुपयांत चहा-नाश्ता मिळत नसल्याचेही स्पष्ट झाले. याची गंभीर दखल एसटी महामंडळाने घेतली.त्यानुसार स्थानिक अधिकाऱ्यांना दररोज तपासणीचे आदेश दिले आहेत. अन्यथा संबंधित अधिकाऱ्याला जबाबदार धरण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
सर्व एसटी स्थानकांमध्ये नाथजलच्या विक्रीचे ठेके देण्यात आले आहेत. त्यासाठी ठेकेदाराला जागाही दिली आहे. पण काही स्थानकांत ते २० रुपयांना विकले जात असल्याच्या तक्रारी येत आहेत. प्रवासा दरम्यान चहा-नाश्ता व जेवणासाठी एसटीने काही खासगी उपाहारागृहांशी करार केला आहे. एसटीला याच उपाहारगृहांवर थांबा घेण्याची सक्ती आहे. प्रवाशांना तेथे ३० रुपयांत हलका नाश्ता व चहा मिळतो. करारात तशी तरतूद आहे. पण त्याचेही सर्रास उल्लंघन होत असल्याच्या तक्रारी देखील एसटीकडे आल्या आहेत. याची दखल घेत महाव्यवस्थापकांनी विभाग नियंत्रकांना पत्र जारी केले आहे. त्यात म्हटले आहे की, ‘परवानाधारक नाथजल विक्रेत्यांकडून वाढीव दराने विक्रीच्या तक्रारींकडे पर्यवेक्षक व अधिकारी जाणूनबुजून दुर्लक्ष करत आहेत. खासगी थांब्यांवरील उपाहारगृहांत ३० रुपयांत चहा-नाश्ता मिळत नसल्याच्याही तक्रारी आहेत. संबंधित उपाहारगृहासोबत करारावेळीच ३० रुपयांत चहा-नाश्त्याचे बंधन आहे. पण त्याची अंमलबजावणी आगार किंवा विभागामार्फत होत नाही. त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाई होत नाही ही खेदाची बाब आहे.’