नागपूर- केंद्रीय रेल्वेच्या नागपूर-सिकंदराबाद वंदे भारत एक्सप्रेसला प्रवाशांकडून कमी प्रतिसाद मिळत असल्याने ही गाडी मार्च महिन्यापासून २० ऐवजी ८ डब्यांसह धावणार असल्याची माहिती मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक विनायक गर्ग यांनी दिली.
रेल्वे व्यवस्थापक विनायक गर्ग यांनी सांगितले की,पाच महिन्यापूर्वी १६ सप्टेंबरपासून नागपूर- सिकंदराबाद वंदे भारत एक्स्प्रेस सुरु करण्यात आली आहे.मात्र पहिल्या दिवसांपासून तुलनेत प्रवासी संख्या ५० टक्के असल्याने २० डबे असलेली वंदे भारत रिकामी चालविण्याऐवजी ८ डब्यांसह चालविण्याचे ठरविले आहे.सध्याच्या घडीला नागपुरातून तीन वंदे भारत एक्सप्रेस धावतात. इतर ‘वंदे भारत’ ला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद आहे.मात्र नागपूर-सिकंदराबाद वंदे भारत एक्सप्रेसला कमी प्रवासी संख्या असल्याने गेल्या महिन्याभरापासून सातत्याने आढावा घेतला जात आहे.आता डब्यांची संख्या कमी करीत ही वंदे भारत प्रवाशांसाठी सुरुच राहणार आहे.वंदे भारत स्लीपर सुपर फास्ट एक्सप्रेसची एक महिन्यापूर्वीच यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे.मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने नागपूर ते मुंबई आणि नागपूर ते दरम्यान वंदे भारत स्लीपर सुपर फास्ट एक्सप्रेस सुरु करण्यासाठी रेल्वे मंडळाकडे पाठविलेला प्रस्ताव विचाराधीन असल्याने आगामी काळात दोन्ही मार्गावर ही रेल्वे धावणार आहे.