नागपूर – काँग्रेस नेते आणि आमदार सुनील केदार यांनी आपल्या सावनेरची निवडणूक बिनविरोध करत विजय मिळवला आहे. नागपूर जिल्ह्यातील ७ तालुक्यांत कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुका होत आहेत. त्यापूर्वीच काँग्रेस नेते आणि आमदार सुनील केदार यांनी आपल्या सावनेर तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक बिनविरोध करत भाजपला धक्का दिला आहे.
नागपूर जिल्ह्यातील सावनेर, रामटेक, कुही-मांढळ, उमरेड, भिवापूर, मौदा आणि पारशिवनी या सात ठिकाणी बाजार समित्यांच्या निवडणूक होणार आहेत. त्यापैकी सावनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ पैकी १८ जागा केदार गटाने बिनविरोध जिंकल्या आहेत. यापूर्वीही सावनेर बाजार समितीवर केदार गटाचे वर्चस्व होते. ते कायम ठेवण्यात त्यांना यावेळीसुद्धा यश आले आहे. सुनील केदार यांच्या नेतृत्वात यापूर्वी नागपूर पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीमध्ये काँग्रेसला यश मिळाले होते. नागपूर जिल्हा परिषदेतसुद्धा केदार यांच्या नेतृत्वात काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता आहे. आता बाजार समितीवर विजय मिळवून केदार यांनी पुन्हा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. नागपूर जिल्ह्यातील १३ कृषी उत्पन्न बाजार समित्यांपैकी ६ बाजार समितीच्या निवडणुका वर्षभरापूर्वी झाल्या आहेत. आता ७ बाजार समितीच्या निवडणुका होत आहेत. त्यासाठी २८ एप्रिल मतदान आणि २९ एप्रिल मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्र सरकारच्या नव्या नियमानुसार या निवडणुका होत असून यामध्ये सात बारा नावावर असलेला कोणताही शेतकरी मतदान करू शकणार आहे.