नागपूर – गोरेवाडा बचाव केंद्रात गेल्या काही दिवसांत बर्ड फ्ल्युमुळे तीन वाघ आणि एक बिबट्याचा मृत्यू झाला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातून ३ आठवड्यांपूर्वी वाघांना गोरेवाड्यातील बचाव केंद्रात स्थलांतरित केले होते. तर बिबट्या हा वन्यजीव संशोधन आणि प्रशिक्षण केंद्रात होता.
या वाघांची आरोग्य तपासणी केली होती. तेव्हा त्यांना कोणताही आजार नसल्याचे आढळले होते. मात्र, ते लंगडत होते आणि अन्न कमी घेत होते. त्यामुळे त्यांच्या काही चाचण्या करण्यात आल्या. त्याही नकारात्मक आल्या होत्या. मात्र, यातील दोन वाघांचा व एका बिबट्याचा २० डिसेंबरला तर एका वाघाचा २३ डिसेंबरला मृत्यू झाला. त्यामुळे गोरेवाड्यातील वन्यजीव संशोधन आणि प्रशिक्षण केंद्रात तपासणी केली असता त्यात बर्ड फ्ल्यु मुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर प्राण्यांचे नमुने भोपाळ येथील पशुवैद्यकीय प्रयोगशाळेत पाठवले होते. त्यातदेखील ‘बर्ड फ्ल्यु’मुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. या पार्श्वभूमीवर आता गोरेवाड्यातील वन्यजीव संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राने राज्यातील प्राणीसंग्रहालय आणि बचाव केंद्रात या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना आणि खबरदारी घेण्याबाबत सूचना दिल्या आहेत.