नागपुरात उन्हाचे चटके वाढू लागले
१५मार्चपासून शाळा सकाळ सत्रात

नागपूर – विदर्भातील नागपूर जिल्ह्यात उन्हाचे चटके वाढू लागले आहेत. गेल्या महिन्यातच यंदा सरासरीपेक्षा जास्त तापमान वाढल्याने महापालिका, जिल्हा परिषद प्रशासनही सतर्क झाले आहे.आता येत्या १५ मार्चपासून ग्रामीण व शहरातील सर्व शाळा केवळ सकाळच्या सत्रात घेण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले.त्यामुळे शहरातील लाखावर विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांनाही मोठा दिलासा मिळाला आहे.

वाढत्या उन्हामुळे यंदा ‘हीट ॲक्शन प्लान’चीही अमलबजावणीही लवकर केली जात आहे. महापालिका प्रशासनाने तयारी पूर्ण केली.यंदाचा उन्हाळा चांगलाच तापदायक ठरणार असल्याचे संकेत फेब्रुवारीमध्येच मिळाले. त्यामुळे महापालिका प्रशासनानेही दोन दिवसांपूर्वीच ‘हीट ॲक्शन प्लान’संदर्भात पोलिस, हवामान विभाग, व्हीएनआयटीचे प्राध्यापक, मनपाचा आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांची बैठक घेतली.यंदा प्रथमच हिट ॲक्शन प्लॅनच्या अंमलबजावणीसाठी फेब्रुवारीमध्ये बैठक घेण्यात आली.

वाढत्या उन्हात शहरात करावयाच्या उपाययोजनांबाबत आयुक्तांनी सूचना केल्या होत्या.शाळांबाबतही त्यांनी शिक्षण विभागाला सूचना केल्या होत्या.वाढत्या तापमानाचा विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये, यासाठी जिल्हा परिषद शिक्षण विभागाने १५ मार्चपासून शाळा सकाळच्या सत्रात सुरू करण्याबाबत निर्णय घेतला.महापालिकेनेही शहरातील शाळांबाबत हाच निर्णय कायम ठेवला, असल्याचे मनपाचे शिक्षणाधिकारी राजेंद्र पुसेकर यांनी नमूद केले. त्यामुळे येत्या १५ मार्चपासून शहरातील शाळांमधील सर्वच वर्ग सकाळच्या सत्रात घेतले जाणार आहे.

Scroll to Top