नांदगाव रेल्वे स्थानकांवर
एक्स्प्रेसचे थांबे पूर्ववत

नांदगाव : करोना प्रादुर्भावामुळे लॉकडाऊनच्या काळात रेल्वे प्रशासनाकडून अनेक रेल्वे गाड्यांचे थांबे रद्द केले होते. मात्र त्यांनतर काही स्थानके पूर्ववत झाली असतानां, नांदगाव रेल्वे स्थानकांवरील एक्स्प्रेस थांबे रद्दच होते. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत होती. दरम्यान प्रवाशी संघटनांतर्फे मागणी केल्यांनतर आता नांदगाव स्थानकांवर एक्स्प्रेस थांबे पूर्ववत करण्यात येणार आहेत. येत्या ८ एप्रिलपासून ही सेवा पूर्ववत सुरू होणार आहे, अशी माहिती केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिली आहे.

करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यांनंतरही जनता, गोरखपूर कृशीनगर व कामयानी एक्सप्रेस या गाड्यांचा नांदगाव येथील स्थानकावरील थांबे रद्दच करण्यात आले होते. मात्र यामुळे प्रवाशांची होणारी गैरसोय आणि थांबे पुर्ववत करण्यासाठी प्रवासी संघटनांतर्फे मागणी करत आंदोलने करण्यात आली. यामुळे प्रवाशांची होत असलेली गैरसोय लक्षात घेत केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे जनता, गोरखपूर कुशीनगर व कामयानी एक्सप्रेस या गाड्यांचा नांदगाव येथील थांबा मंजूर करण्याबाबत मागणी केली.

या संदर्भात रेल्वेमंत्र्यांनी तात्काळ रेल्वे प्रशासनास सदर गाड्यांचे थांबे पूर्ववत करण्यासाठी आदेश दिले. रेल्वे बोर्डाचे संयुक्त निर्देशक विवेक कुमार सिन्हा यांनी त्याबाबतचे आदेश निर्गमित केले असल्याने येत्या ८ एप्रिल पासून नांदगाव स्थानकावरील रेल्वेसेवा पूर्ववत होणार आहे. या निर्णयामुळे प्रवाशांची होणारी गैरसोय थांबणार आहे. प्रवासी संख्या विचारात घेऊन प्रायोगिक तत्वावर रेल्वे थांबे मंजूर केले आहेत.

Scroll to Top