नवी दिल्ली – नव्या संसद भवनाचे २८ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. या संसद भवनात सेंगोल नावाने ओळखला जाणारा पारंपरिक राजदंड ठेवण्यात येणार आहे. तसेच या संसद भवनाच्या निर्मितीसाठी योगदान दिलेल्या ६० हजार श्रमिकांचाही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते सन्मान करण्यात येणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पत्रकार परिषदेत असे सांगितले की, नव्या संसद भवनाच्या उद्घाटनावेळी ऐतिहासिक परंपरेचे पुनरुज्जीवन होणार आहे. पारंपरिक राजदंड असलेला सेंगोल संसद भवनात कायमस्वरूपी सभापतींच्या खुर्चीशेजारी ठेवण्यात येणार आहे. सेंगोल या राजदंडाला अनेक शतकांची परंपरा आहे. या पारंपरिक भारतीय राजदंडाला तमिळमध्ये सेंगोल म्हणतात. याचा अर्थ संपदेतून संपन्नता असा होतो.
१९४७ मध्ये देश स्वतंत्र झाला, तेव्हा तामिळनाडूहून आलेल्या विद्वानांच्या हस्ते तेव्हाचे पंतप्रधान पंडित नेहरू यांना देण्यात आला होता. त्यानंतर त्याचे अलाहाबादच्या एका संग्रहालयात जतन करण्यात आले होते. आता हा सेंगोल पुन्हा एकदा विधिवत पंतप्रधान नरेंद्र मोदींना देण्यात येणार आहे. आता हा सेंगोल संसदेत कायमस्वरूपी ठेवला जाणार आहे.