नव्या आयकर विधेयकावर सूचना पाठविण्याचे आवाहन

नवी दिल्ली – सीबीडीटी अर्थात केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे प्रमुख रवी अग्रवाल यांनी काल सोमवारी उद्योग क्षेत्रातील कंपन्यांना या आठवड्यात संसदेत मांडल्या जाणाऱ्या नवीन आयकर विधेयकावर सूचना पाठविण्याचे आवाहन केले आहे. हे नवीन आयकर विधेयक सहा दशके जुन्या असलेल्या प्राप्तिकर कायदा, १९६१ ची जागा घेणार आहे.

रवी अग्रवाल यांनी सांगितले की, हे नवीन आयकर विधेयक सहा महिन्यांत तयार करण्यात आले आहे. यामध्ये करदात्यांना कर नियमांचे पालन करण्यासाठी आणि ते वाचण्यास व समजण्यास सोपे जावे यासाठी त्याची भाषा सुलभ करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. नवीन विधेयक अशा प्रकारे तयार करण्यात आले आहे की ते आंतरराष्ट्रीय मानकांना पूर्ण करणारे असेल. तसेच, नवीन कायदा संक्षिप्त करण्यात आला आहे, कारण जुन्या तरतुदी काढून टाकण्यात आल्या आहेत, ज्यामुळे ते हलके झाले आहे. नवीन विधेयक सादर झाल्यानंतर उद्योगांनी त्यांच्या सूचना पाठवाव्या. त्यांच्या सूचनांचा नक्की विचार केला जाईल.

दरम्यान, रवी अग्रवाल हे अद्ययावत आयटी रिटर्नबाबत म्हणाले की, गेल्या तीन वर्षांत सुमारे ९० लाख असे रिटर्न दाखल करण्यात आले आहेत. त्यातून सुमारे ८,५०० कोटी रुपये अतिरिक्त महसूल मिळाला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात म्हटले होते की, कोणत्याही मूल्यांकन वर्षासाठी अपडेटेड आयटीआर दाखल करण्याची वेळ मर्यादा सध्याच्या दोन वर्षांच्या मर्यादेवरून चार वर्षांपर्यंत वाढवली जाईल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top