नवी मुंबई- आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याची योजना नवी मुंबई महापालिकेच्या वतीने लागू करण्यात आली आहे. या योजनेचे अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत ३० नोव्हेंबरपर्यंत वाढवली आहे, अशी माहिती समाज विकास विभागाचे उपायुक्त किसनराव पलांडे यांनी दिली.
त्यासाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने www.schemenmmc.com या संकेतस्थळावर स्वीकारण्यात येत आहेत. अद्यापपर्यंत ३१ हजारहून अधिक अर्ज प्राप्त झाले असल्याचे त्यांनी सांगितले. महापालिका कार्यक्षेत्रातील इयत्ता पहिली ते महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेल्या गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शिष्यवृत्ती वितरण करणे ही योजना पालिकेमार्फत ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येत आहे. २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाकरिता शिष्यवृत्ती योजनेमध्ये विधवा/घटस्फोटित महिलांच्या मुलांना,आर्थिक व दुर्बल घटकातील इयत्ता पहिली ते महाविद्यालयीन विद्यार्थांना, इयत्ता पहिली ते महाविद्यालयीन शिक्षणासाठी गुणवत्ताप्राप्त मागासवर्गीय विद्यार्थांना, महापालिका क्षेत्रातील स्थानिक प्रकल्पग्रस्तांच्या कुटुंबातील इयत्ता पहिली ते महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या मुलांना, पालिका आस्थापनेवरील सफाई कामगार व कंत्राटी पद्धतीवर असलेल्या कामगारांच्या मुलांना, नवी मुंबई क्षेत्रातील दगडखाण/ बांधकाम/ रेती/ नाका कामगारांची मुलांना अशा विविध घटकांतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक शिष्यवृत्ती वितरण करण्यात येणार आहे. त्यामुळे पात्र विद्यार्थ्यांनी व त्यांच्या पालकांनी लवकरात लवकर ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन समाज विकास विभागाचे उपायुक्त किसनराव पलांडे यांनी केले आहे.