नवी मुंबई महानगरपालिकेचा उत्पन्नवाढीसाठी टास्क फोर्स

नवी मुंबई – नवी मुंबई महानगरपालिकेच्या उत्पन्नवाढीसाठी महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी टास्क फोर्सची स्थापन केली असून ही पाच सदस्यीय समिती महानगरपालिकेचे उत्पन्न वाढविण्याकरिता उपाय सुचविणार आहे. त्यामध्ये थकबाकी वसूलीकरिता व विद्यमान वसूलीकरिता नियोजन करुन सोबतच उत्पन्नवाढीचे नवीन स्त्रोत सूचित करणार आहे. याबाबतचा अहवाल 15 दिवसात सादर करण्याचे निर्देश आयुक्तांमार्फत देण्यात आले आहेत.
अतिरिक्त आयुक्त श्री. सुनिल पवार यांच्या अध्यक्षतेखाली हा टास्क फोर्स कार्यरत असणार असून मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. सत्यवान उबाळे, मालमत्ता कर विभागाचे उप आयुक्त श्री. शरद पवार, अतिरिक्त शहर अभियंता श्री. अरविंद शिंदे, सहा. संचालक नगररचना श्री. सोमनाथ केकाण असे चार सदस्य महानगरपालिकेच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी नियोजन करणार आहेत.
उत्पन्नवाढीसाठी उपाय सूचविताना टास्क फोर्सने विद्यमान कार्यपध्दतीमध्ये कोणते बदल करावे लागतील याच्या सूचना कराव्यात व असे बदल केल्यानंतर त्याची अंमलबजावणी कशा पध्दतीने व किती दिवसात करता येईल आणि कधीपासून उत्पन्नवाढ होईल हे प्रस्तावात नमूद करावे असे सूचित करण्यात आलेले आहे.
थकबाकी, चालू वसूली व नवीन स्त्रोतामधून अपेक्षित वाढ याचे नियोजन सादर करण्याच्याही सूचना देण्यात आलेल्या आहेत. याशिवाय खर्चात बचत ही एक प्रकारे उत्पन्नवाढ असून त्यादृष्टीने आवाजावी खर्च टाळून व आवश्यक तेथे काटकसर करुन खर्चामध्ये किती बचत होईल याचीही माहिती सादर करण्याचे आदेशात नमूद आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top