मुंबई – नवी मुंबईहून समुद्रामार्गे मुंबईत आणि अलिबाग येथे जाता यावे यासाठी महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाने स्पीडबोट सेवा सुरू केली होती. मात्र, गेल्या आठवड्यापासून ही सेवा बंद आहे. यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. या सेवेला सुरु होऊन केवळ सहाच महिने झाले होते. यामुळे अलिबाग येथील नागरिकांना मांडवा येथे जाणे सोईचे झाले होते.
ही बोट सेवा आठवड्यातून दोन दिवस शनिवार आणि रविवार सुरू होती. याला पर्यटकांचाही चांगला प्रतिसाद मिळत होता. मात्र, आता ही बोट बंद असल्याने अनेक नागरिकांना प्रवासासाठी इतर पर्यायांचा वापर करावा लागत आहे. ज्यामुळे त्यांना प्रवासासाठी अधिक पैसे देखील मोजावे लागत आहेत. अलिबाग आणि मांडवा येथे विविध ठिकाणाहून अनेक पर्यटक येत असतात. त्यातच उन्हाळी सुट्ट्यांमध्ये पालकवर्ग मोठ्या प्रमाणात या ठिकाणी फिरायला जातो. मात्र, ही बोट गेल्या आठवड्याभरापासून बंद असल्याने पर्यटकांची मोठी गैरसोय होत आहे. अजून महिनाभर ही बोट सुरू होण्याची शक्यता कमी असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे मे महिन्यापर्यंत ही सेवा बंद राहणार आहे. या बोटीत काही तांत्रिक बिघाड झाल्याने, ही सेवा बंद ठेवण्यात आल्याचे सांगितले जाते.