नवी मुंबई :
मोरबे धरण ते दिघा मुख्य जलवाहिनी व भोकरपाडा जलशुध्दीकरण केंद्र येथील मान्सुनपूर्व देखभाल व दुरूस्तीचे कामे हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे नवी मुंबईत ३० मे रोजी संध्याकाळचा पाणीपुरवठा होणार नसल्याची माहिती अतिरिक्त शहर अभियंता मनोज पाटील यांनी दिली.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून मान्सूनपूर्व कामे मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. यामध्ये जलउदंचन केंद्रातील पंप आणि अन्य यंत्रसामुग्री यांची देखभाल करणे, पावसाळ्यात वीजपुरवठा खंडित झाल्यास पर्यायी वीज व्यवस्था उपलब्ध करणे, जलवाहिन्यांना कुठे गळती लागली असेल तर त्यांची दुरुस्ती करणे, आदी कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. त्याचबरोबर ३० मे या दिवशी भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्र, मोरबे धरण ते दिघा मुख्य जलवाहिनी या ठिकाणी देखभाल दुरुस्तीची आणि इतर कामे करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्रातून होणारा पाणीपुरवठा १२ तासांकरिता बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे ३० मे रोजी संध्याकाळचा पाणीपुरवठा नवी मुंबईकरांना होणार नाही. तसेच ३१ मे रोजी सकाळी पाणीपुरवठा अल्प दाबाने होणार आहे.