नवी दिल्ली :
राजधानी दिल्लीमध्ये कोसळणार्या मुसळधार पावसामुळे आज नव्या संसद भवनाच्या छतातून गळती सुरू झाली. काँग्रेसच्या नेत्याने यासंबंधी व्हिडिओ पोस्ट केला आहे. काही महिन्यांपूर्वीच अगदी दिमाखात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्या संसदेचे उद्घाटन केले होते. मात्र वर्ष होण्याआधीच नव्या संसदेला गळती लागल्याने विरोधकांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले. या गळतीवरून विरोधक लोकसभेत स्थगन प्रस्ताव मांडणार असल्याचेही त्यांनी सागितले. पहिल्या पावसात अयोध्येतील राम मंदिराला गळती लागल्याचा प्रकार उघडकीस आला होता. यावरून विरोधकांनी जोरदार टीका केली होती.
कालपासून राजधानी दिल्लीमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसाने दिल्लीमधील मुख्य रस्ते जलमय झाले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. दिल्लीत पडलेल्या मुसळधार पावसाचा फटका नव्या संसद भवनाच्या इमारतीला बसला असून संसद भवनाला गळती लागली आहे. राष्ट्रपतींनी वापरलेल्या संसदेच्या लॉबीमध्ये पाणी गळू लागले. त्यानंतर त्याठिकाणी बादली ठेवण्यात आली.
तामिळनाडूचे विरुधुनगरचे खासदार मणिकम टागोर यांनी पाणीगळतीचा हा व्हिडीओ पोस्ट केला होता. त्यांनी पोस्टमध्ये लिहिले की, “बाहेर पेपर लीकेज आणि आता वॉटर लीकेज. राष्ट्रपती वापरतात त्या संसद लॉबीमध्ये पाणी गळती. बांधकाम पूर्ण झाल्यानंतर एक वर्षात ही स्थिती. या मुद्यावर लोकसभेत स्थगन प्रस्ताव मांडणार.” ही पोस्ट व्हायरल होऊ लागताच सपाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी देखील या व्हिडीओवरून मोदी सरकारवर टीका केली आहे. ते म्हणाले, नव्या संसदेपेक्षा जुनी संसद चांगली होती. तिथे जुने संसद सदस्य येऊन भेटू शकत होते. अब्जावधी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या नव्या संसदेत गळती सुरु आहे, तो पर्यंत जुन्या ससंसेत का जाऊ नये?”
नव्या संसदभवनाला लागलेल्या गळतीवर खासदार संजय राऊत म्हणाले की “फक्त देशाचे संसद भवनाला नाही तर अयोध्येच्या राम मंदिराल देखील गळती लागली आहे. ठेकेदारांच्या माध्यमातून निवडणुकीसाठी पैसे घ्यायचे, हा उद्योग आहे. राष्ट्रीय अस्मिता कुठे शिल्लक आहे? संसदेत अशी अवस्था असेल, तर सदस्य आणि जनतेने प्रश्न का विचारू नये”