मुंबई- राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने राज्यात नवीन पदव्युत्तर वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी आणि महाविद्यालयात जागा वाढविण्यासाठी अर्ज करण्यास मुदतवाढ दिली आहे.या दोन्ही बाबींसाठी ही मुदतवाढ २२ नोव्हेंबरपर्यंत देण्यात आली आहे.
आगामी शैक्षणिक वर्षात पदव्युत्तर वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याबाबत तसेच महाविद्यालयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या जागा वाढविण्यासाठी अर्ज करण्याचे वैद्यकीय मूल्यांकन आणि क्रमवारी मंडळाने आवाहन केले होते. हे मंडळ राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाशी संलग्न आहे. याबाबतचे परिपत्रक १८ सप्टेंबर रोजी मंडळाकडून जारी करण्यात आले होते. त्यामध्ये राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या संकेतस्थळावर १७ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याची सूचना करण्यात आली होती. त्यानंतर ही मुदत ८ नोव्हेंबर करण्यात आली होती. दरम्यानच्या काळात शैक्षणिक संस्थांकडून अर्ज करण्यास मिळत असलेला प्रतिसाद लक्षात घेता आता अर्ज सादर करण्यास पुन्हा २२ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे.यावेळी अर्ज करण्यासंदर्भातील अटी व शर्ती परिपत्रकानुसार कायम राहणार आहेत.