*पाच हजार पणत्यांसह
५० मशाली प्रज्वलित
देवगड – विजयदुर्ग ग्रामविकास मंडळाच्यावतीने नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने १ जानेवारीला ऐतिहासिक किल्ला विजयदुर्ग पणत्यांनी उजळणार आहे. सुमारे ५० मशाली आणि पाच हजार पणत्या एकाचवेळी प्रज्वलित करण्यात येणार आहेत.या पार्श्वभूमीवर आज रविवारी सकाळी या किल्ल्यावर ग्रामस्थांनी स्वच्छता मोहीम राबविली.
नववर्षाच्या दिवशी १ जानेवारीला दुपारी ३.३० वाजता विजयदुर्ग पंचक्रोशीतील विजयदुर्ग, रामेश्वर, गिर्ये या तीन्ही ग्रामपंचायती आणि ग्रामस्थ यांच्यासह सडेवाघोटण, नाडण,पडेल, मोंड, वाडा, वाघोटण,सौंदाळे, मणचे, फणसे,पडवणे,फणसगांव, तिर्लोट येथील शिवप्रेमी मिळून सुमारे ५० मशाली आणि पाच हजार पणत्या एकाचवेळी प्रज्वलित करणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पालखीसह ढोल ताशांच्या गजरात ऐतिहासिक व सांस्कृतिक परंपरा जपत मिरवणूकीत सहभागी होऊन दीपोत्सव साजरा केला जाणार आहे. या कार्यक्रमास सिंधुदुर्ग जिल्ह्याचे अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक ऋषिकेश रावले व अतुल रावराणे हे उपस्थित राहणार आहेत. शुक्रवार ३ जानेवारी रोजी महारक्तदान शिबीरही आयोजित केले आहे.