नाशिक- नाशिक जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रातील असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या येथील श्री रेणुका मातेचे मंदिर रात्री एकपर्यंत खुले राहणार आहे. या देवीच्या दर्शनासाठी नवरात्रोत्सवात लाखो भाविक येतात. भाविकांच्या सोयीसाठी १२ हजार क्वेअर फुटांचा वॉटरप्रुफ मंडप बांधण्यात आला आहे.
श्री रेणुका देवीच्या शारदीय नवरात्रोत्सवाच्या ३ ऑक्टोबरपासून सुरू होत असलेल्या येथील पार्श्वभूमीवर उत्सवाची पूर्वतयारी व यात्रा कालावधीत करावयाच्या उपाययोजनांबाबत शासकीय विभागप्रमुखांसमवेत देवी मंदिर ट्रस्टच्या कार्यालयात आयोजित आढावा बैठक पार पडली. या बैठकीत वैद्यकीय पथक, सुरक्षा पथक कार्यान्वित करणे, रुग्णवाहिका, इमर्जन्सी कीट, गर्दीचे नियोजन करण्याबाबत सूचना देण्यात आल्या. जत्रोत्सव काळात वीजपुरवठा खंडीत होणार नाही, याची दक्षता घेण्याची अपेक्षा रेणुका देवी संस्थानचे सहायक व्यवस्थापक सुभाष पवार यांनी व्यक्त केली. जत्रोत्सवात वाहतूक कोंडी होऊन भाविकांची गैरसोय होणार नाही. यासाठी उपाययोजना करण्याबाबत यावेळी विचारविनिमय करण्यात आला. यावेळी नगरपरिषद प्रशासनाचे अधिकारी अनुपस्थित असल्याने परिसराची स्वच्छता व मोबाइल टॉयलेटच्या उपाययोजनांबाबत नगरपालिका प्रशासनास पत्र देण्याची सूचना तहसीलदार मंदार कुलकर्णी यांनी केली.