पंढरपूर- आषाढी, कार्तिक एकादशीसह इतरही दिवशी पंढरपुरातील विठुरायाच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने गर्दी करतात. या गर्दीमुळे विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविकांना अनेक तास रांगेत तिष्ठत उभे राहावे लागते. या गर्दीमध्ये अनेक नवदाम्पत्यांचाही समावेश असतो. आता अशा नव्याने लग्न केलेल्या जोडप्यांना विठ्ठलाचे थेट दर्शन घेता येणार आहे. त्यांना कोणत्याही रांगेत उभे राहण्याची गरज पडणार नाही.
राज्यभरातून आलेल्या नवीन जोडप्याला विठुरायाच्या दर्शनासाठी थांबावे लागणार नसून, या नवदाम्पत्याला सोबत आलेल्या तीन लोकांसह थेट दर्शन दिले जाणार आहे. मंदिर समितीच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 8 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या माघ यात्रेसाठी मंदिर समितीची बैठक झाली. या बैठकीत आषाढी आणि कार्तिकी या महायात्राप्रमाणेच माघी वारीत सुद्धा भाविकांना तशाच सुविधा दिल्या जाणार असल्याचे मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले. माघ यात्रा काळात ऑनलाईन आणि व्हीआयपी दर्शन हे पूर्णपणे बंद राहणार असून, भाविकांना जलद दर्शन होण्यासाठी रांगेकरिता सहा पत्रा शेड उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आहे. पंढरपूर शहरातील नागरिकांसाठीही आता सकाळी सहा ते सात आणि रात्री दहा ते साडेदहा या वेळात थेट दर्शन दिले जाणार आहे. यापूर्वी स्थानिक नागरिकांसाठी सकाळी सहा ते साडेसहा एवढाच वेळ थेट दर्शनासाठी असायचा.
दर्शनरांगेत मृत्यू झाल्यास
एक लाख रुपयांची मदत
विठुरायाच्या दर्शनासाठी येणारे अंध, अपंग, दिव्यांग आणि चालता न येणारे अतिवृद्ध यांना झटपट दर्शन दिले जाणार आहे. विठुरायाच्या दर्शन रांगेत मृत्यू झालेल्या भाविकाच्या कुटुंबाला एक लाख रुपयांची आर्थिक मदत व मृतदेह गावापर्यंत नेण्याचा खर्च आता मंदिर समिती उचलणार असल्याचे मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ औसेकर यांनी सांगितले.
नवदाम्पत्याला विठुरायाचे आता थेट दर्शन मिळणार
