नवी दिल्ली – मणिपूर हिंसाचारावर संसदेत मौन बाळगून असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षांच्या ’इंडिया’ नावावर मात्र तोंडसुख घेतले. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीपासून दहशतवादी इंडियन मुजाहिदीन आणि पीएफआयपर्यंत अनेक संघटनांच्या नावात इंडिया आहे. केवळ ‘इंडिया’ नाव लावून काही होत नाही, अशी टीका मोदींनी भाजपच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत केली.
विरोधी पक्षांच्या आघाडीने पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार विरोधात एकजूट दाखवत कंबर कसली आहे. विरोधकांच्या आघाडीचे ‘इंडिया’ असे नाव ठरल्यानंतर या संघर्षाला ‘भाजप विरुद्ध इंडिया’ असा रंग चढला आहे. या इंडिया नावावरून आज पंतप्रधान मोदी यांनी भाजपा संसदीय दलाच्या बैठकीत टीका केली. ‘इंडिया’ हा केवळ विरोधकांचा लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे. नावात इंडिया असून काही होत नाही. ईस्ट इंडिया कंपनी आणि इंडियन मुजाहिदीन, पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या दहशतवादी संघटनांच्याही नावात इंडिया आहे, असे मोदी या बैठकीत म्हणाले. ‘पुढील लोकसभा निवडणुकीनंतरही आपण विरोधी बाकांवरच बसणार आहोत, याची जाणीव झाल्यामुळे विरोधक नैराश्यात आहेत. मी असे दिशाहिन विरोधक कधीही पाहिले नव्हते,’ असे मोदी म्हणाल्याचे केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी सांगितले.
या बैठकीत मोदींनी खासदारांना 2024 च्या लोकसभेसाठी तयार होण्याचे आवाहन केले. ते खासदारांना म्हणाले की, 2024 मध्येही आपणच सत्तेवर येणार आहोत. विरोधकांच्या आंदोलनामुळे विचलित होऊ नका. त्यांचे काम विरोध करणे हेच आहे. सरकारी योजनांचे लाभ कानाकोपर्यात पोहोचतील, हे पाहा, असे मोदींनी आपल्या खासदारांना सांगितले. मात्र मणिपूरविषयी मोदी या बैठकीतही अवाक्षर बोलले नाहीत. राहुल गांधी यांनी मोदींच्या वक्तव्यावर टीका करत प्रतिक्रिया दिली. ‘आम्हाला काहीही म्हणा, पण आम्हीच इंडिया आहोत. आम्ही मणिपूरच्या जखमा भरण्यास मदत करू, तेथील महिला, मुलांच्या दु:खावर फुंकर घालू, आम्ही प्रेम आणि शांतता परत आणू, आम्ही मणिपूरमध्ये आयडिया ऑफ इंडिया नव्याने रुजवू,’ असे ट्विट राहुल गांधी यांनी केले. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी ट्विट करत म्हटले की, आम्ही मणिपूरबद्दल बोलतो आणि पंतप्रधान संसदेबाहेर इंडियाचा उल्लेख ईस्ट इंडिया कंपनी असा करतात! ब्रिटीशांचे गुलाम भाजपचे राजकीय पूर्वज आहेत. काँग्रेस पक्ष नेहमीच भारतमातेसोबत आहे.
नरेंद्र मोदींनी विरोधकांना डिवचले ‘इंडिया’ शब्द ईस्ट इंडिया कंपनीतही आहे
