उल्हासनगर – राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या दिवंगत आमदार ज्योती कलानी यांचे स्वीय सहाय्यक नंदकुमार ननावरे आणि त्यांची पत्नी यांच्या आत्महत्या प्रकरणी अटकेत असलेल्या चारही आरोपींना अखेर एक महिन्यातच जामीन मंजूर झाला आहे. पोलीस या आरोपींविरोधात पुरावे सादर करू न शकल्याने या चौघांना कल्याण सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला.
जामीन मंजूर झालेल्या चौघांची नावे ओमी टीम कलानीचे प्रवक्ता कमलेश निकम,आमदार डॉ.बालाजी किणीकर यांचे स्वीय सहाय्यक शशिकांत साठे आणि नरेश गायकवाड व गणपती कांबळे अशी आहेत. या घटनेतील मुख्य आरोपी संग्राम निकाळजेसह खासदार रणजितसिंह नाईक निबांळकर,वकील ज्ञानेश्वर देशमुख,वकील नितीन देशमुख यांनाही अटकपूर्व जामीन मिळाल्याची माहिती फिर्यादी धनंजय ननावरे यांचे वकील गोपाळ भगत यांनी दिली.१ ऑगस्ट रोजी नंदकुमार ननावरे यांनी आपल्या पत्नीसोबत उल्हासनगर येथील आपल्या राहत्या घराच्या तिसर्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली होती. काही राजकीय व्यक्तिंना कंटाळून ही आत्महत्या केल्याचे म्हटले जात होते. ननावरे यांनी आत्महत्येपूर्वी चित्रफित बनवली होती. त्यात खासदार रणजित नाईक निंबाळकर, संग्राम निकाळजे,वकील ज्ञानेश्वर देशमुख,वकील नितीन देशमुख यांना आपल्या आत्महत्येला जबाबदार धरले होते.
या आत्महत्या घटनेनंतर मृत ननावरे यांचे बंधू धनंजय ननावरे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आणि पंतप्रधान मोदींचे नाव घेऊन आपल्या मृत भावाला न्याय देण्यासाठी बोटे कापून घेतल्याने हे आत्महत्या प्रकरण देशभर गाजले होते.धनंजय ननावरे यांनी कॅमेऱ्यासमोर आपले बोटे कापल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. दरम्यान,पोलिसांनी याप्रकरणी चिठ्ठीत नावे आढळलेल्या चौघांना अटक केली.त्यावेळी पोलिसांनी महिनाभरात दोनवेळा न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली.त्यानंतर आता अवघ्या २८ दिवसांत कल्याण सत्र न्यायालयाने जामीनही मंजूर केला. पोलीस पुरावे सादर करू न शकल्याने चौघांना जामीन देण्यात आल्याचे तक्रारदार ननावरे यांचे वकील गोपाळ भगत यांनीच दिली.
ननावरे दाम्पत्य आत्महत्या प्रकरणात आरोपींना महिनाभरात जामीन मंजूर
