पालघर- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदराचे भूमिपूजन पार पाडले. या कार्यक्रमातील आपल्या भाषणात मोदी यांनी सिंधुदुर्गातील मालवण येथील किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्याच्या घटनेची दखल घेत माफी मागितली. आपल्या 10 वर्षांच्या कार्यकालात मोदींनी प्रथमच एखाद्या गोष्टीबद्दल इतकी सपशेल माफी मागितली. मोदी म्हणाले की, मालवणमध्ये काही दिवसांपूर्वी जे झाले ते अतिशय वेदनादायी होते. छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे आराध्य दैवत आहे. मालवण येथील शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी मी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी नतमस्तक होऊन माफी मागतो. या घटनेमुळे शिवभक्तांच्या मनाला ठेच लागली आहे, त्यांचीही मी माफी मागतो.
बहुचर्चित वाढवण बंदराच्या पायाभरणीचा कार्यक्रम पालघर येथील सिडको मैदानावर पार पडला. या कार्यक्रमाला केंद्रिय मंत्री सर्वानंद सोनोवाल, पुरुषोत्तम रुपाला, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थित होते. या कार्यक्रमात मोदी म्हणाले की, आमचे संस्कार वेगळे आहेत. आम्ही ते नाही, जे या भूमीचे सुपुत्र वीर सावरकरांना अपमानित करतात, शिव्या देतात. देशभक्तांच्या भावना चिरडतात. वीर सावरकरांना शिव्या देऊनही माफी मागायला तयार होत नाहीत. ते न्यायालयात लढाई लढायला तयार आहेत. देशाच्या एवढ्या महान सुपुत्राचा अपमान करून ज्यांना पश्चाताप होत नाही, त्यांचे संस्कार महाराष्ट्राच्या जनतेने ओळखावेत. आज महाराष्ट्रात आल्यावर मी सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांची माफी मागण्याचे काम करत आहे. माझे संस्कार वेगळे आहेत. आमच्यासाठी आमच्या आराध्य दैवताशिवाय काहीही मोठे नाही. 2014 मध्ये पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून माझे नाव निश्चित केल्यानंतर मी रायगड किल्ल्यावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीसमोर जाऊन प्रार्थना केली होती. एक भक्त आपल्या आराध्य दैवताची प्रार्थना करतो, तसा मी राष्ट्रसेवेच्या यात्रेला प्रारंभ केला होता.
पुतळा प्रकरणावरून माफी मागितल्यानंतर मोदी पुढे म्हणाले की, आजचा दिवस महाराष्ट्राच्या विकासासाठी ऐतिहासिक दिवस आहे. विकसित महाराष्ट्राच्या, विकसित भारताच्या संकल्पाचा दिवस आहे. मागील 10 वर्षे असो किंवा सरकारचा तिसरा कार्यकाळ असो, आमच्या सरकारने महाराष्ट्रासाठी मोठे निर्णय घेतले आहेत. महाराष्ट्राकडे विकासाचे स्रोत आहेत. महाराष्ट्रात राज्याच्या तसेच देशाच्या विकासाची मोठी क्षमता आहे. त्यामुळेच आज वाढवण बंदराचे भूमिपूजन करण्यात आले आहे. या बंदरासाठी जवळपास 76 हजार कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे, या बंदरामुळे महाराष्ट्र औद्योगिक प्रगतीचे एक केंद्र बनेल.
त्यानंतर या प्रकल्पावरून मोदींनी विरोधकांवर निशाणा साधला. ते म्हणाले की, महाराष्ट्र विरोधी पक्षांनी नेहमी तुमच्या विकासाला, तुमच्या हिताला ब्रेक लावण्याचे काम केले. याचे उत्तर उदाहरण वाढवण बंदर आहे. आपल्या देशाला मोठ्या पोर्टची गरज होती. पालघरचे वाढवण बंदर त्यासाठी उपयुक्त जागा आहे. पण हा प्रोजेक्ट 60 वर्ष लटकवला. काही लोक तो सुरूच करत नव्हते. 2014 मध्ये दिल्लीत आमचे सरकार आले. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आले, तेव्हा त्यांनी गंभीरपणे काम सुरू केलं. 2020मध्ये बंदर बनवण्याचा निर्णय घेतला. पण त्यानंतर महाराष्ट्रातील सरकार बदलले. त्यानंतर अडीच वर्ष कोणतेही काम झाले नाही. या एका प्रकल्पामुळे अनेक लाख कोटींची गुंतवणूक येणार आहे. 12 लाख रोजगार येणार आहेत. तरीही काही लोक या विकासाच्या आड येत होते. महाराष्ट्राच्या विकासाला ब्रेक लावणारे हे कोण लोक होते? राज्यातील तरुणांना रोजगार मिळण्यास कुणाचा आक्षेप होता? आधीच्या सरकारने हे काम पुढे का नाही नेले? ही गोष्ट राज्यातील लोकांनी कधीच विसरू नये. खरे तर काही लोकांना महाराष्ट्राला मागास ठेवायचे आहे. पण आमची सरकारला, महायुतीच्या सरकारला राज्याला देशात सर्वात पुढे न्यायचे आहे.
मोदी यांनी वाढवण बंदराविषयी माहितीदेखील आपल्या भाषणात दिली. त्यांनी सांगितले की, या पोर्टवर 76 हजार कोटीहून अधिक जास्त रक्कम खर्च करणार आहोत. हे देशातील सर्वात मोठं कंटेनर पोर्ट असेल. देशच नाही तर जगातील सर्वात मोठं पोर्ट असणार आहे. आज देशातील सर्व कंटेनर पोर्टातून जेवढे कंटेनर येतील जातील, संपूर्ण देशातील मी सांगतो, त्याच्यापेक्षा जास्त कंटेनरचं काम एकट्या वाढवण बंदरात होणार आहे. तुम्ही अंदाजा लावू शकता.
स्थानिकांचे निषेध आंदोलन
मोदी यांच्या या कार्यक्रमाला पालघरचे मच्छिमार, आदिवासी, शेतकरी यांनी मात्र विरोध केला. हे स्थानिक आज हजारोंच्या संख्येने शंखोदर, वाढवणच्या समुद्र किनाऱ्यावर जमले होते. त्यांनी मोदी गो बॅकच्या घोषणेने परिसर दणाणून सोडला.आंदोलकांनी त्यांना काळे झेंडे दाखवत आपला निषेध नोंदवला.
या आंदोलनात समाजवादी गणराज्य पार्टीचे अध्यक्ष कपिल पाटील, कम्युनिस्ट आमदार विनोद निकोले, आमदार सुनील भुसारा, वाढवण बंदर विरोधी संघर्ष समितीचे नारायण पाटील, विनीत पाटील, किरण कोळी, ब्रायन लोबो, पूर्णिमा मेहेर, वैभव वझे सहभागी
झाले होते.
लोकांच्या असंतोषला घाबरून किनाऱ्यावरपट्टीपासून दूर पालघरला त्यांना पायाभरणी करावी लागली. जिल्ह्यातील प्रत्येक गावात पोलीस बंदोबस्त आहे. लोकांना बाहेर पडू दिलेलं नाही. तरीही हजारो लोकं निषेधासाठी जमले. पायाभरणीसाठी स्थानिकांना बसेस देण्यात आल्या होत्या. पण त्यांनी त्या बसेसही रिकाम्या परत पाठवल्या. हा प्रकल्प झाला तर केवळ वाढवण नाही तर मुंबईपर्यंतचे किनारपट्टीचे सगळे मच्छिमार उद्धवस्त होणार आहेत. शेतकरी आणि आदिवासी यांचीही वाताहत होणार आहे. त्यांची कोणतीही हमी न घेता सरकार हे राबवत असेल तर त्याला लोक विरोध करतील. बंदराचा हा आटापिटा कशासाठी आहे, देशाच्या विकासासाठी की अदानीच्या विकासासाठी? असा प्रश्न आंदोलक नेते कपिल पाटील
यांनी केला.
शरद पवारांवर टीका टाळली
मोदी यांनी आज आपल्या भाषणात विरोधकांवर टीका केली असली तरी शरद पवार यांच्याविषयी कुठलेही वक्तव्य केले नाही. लोकसभा निवडणुकीआधी मोदींनी आपल्या अनेक भाषणांतून शरद पवार यांना लक्ष्य केले होते. त्यांना भटकती आत्मा संबोधले होते. त्याचा लोकसभा निवडणुकीत फटका बसल्यामुळे मोदी यांनी यावेळी शरद पवार यांच्यावर बोलणेच टाळले.