नगर – तालुक्यातील नारायणडोहो गावच्या शिवारात बुधवारी दुपारी जिवंत हातबॉम्ब आढळला. हा हातबॉम्ब सुमारे २१० वर्षांपूर्वीचा म्हणजे १८१४ मधील रशियन बनावटीचा असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.दरम्यान,नगर तालुका पोलिसांनी लष्कराच्या पथकाच्या मदतीने या बॉम्बचा निर्मनुष्य ठिकाणी स्फोट घडवून तो निकामी केला.
नारायणडोहो गावातील बाबासाहेब फुंदे यांच्या शेतात हा हातबॉम्ब आढळला.त्यांनी यासंदर्भात नगर तालुका पोलिसांना माहिती दिली.पोलिसांनी घटनास्थळी पोहचून बॉम्बची पाहणी केली. तालुका पोलिस ठाण्यातील जुन्या कागदपत्रांची पडताळणी केली असता त्यातील माहितीनुसार हा रशियन बनावटीचा १८१४ मधील हातबॉम्ब असावा.
लष्करी तंत्रज्ञानाच्या मदतीने निर्मनुष्य ठिकाणी या हातबॉम्बचा स्फोट घडवत तो निकामी केला.यापूर्वीही नारायणडोहो परिसरात दोन हातबॉम्ब सापडले होते. बॉम्ब सापडण्याची ही आत्तापर्यंतची तिसरी घटना आहे. यापूर्वी एका घटनेत बॉम्बचा स्फोट होऊन एकजण जखमीही झाला होता.