नंदुरबार – नंदुरबार जिल्हा रुग्णालयातील अपूर्ण साधनसामग्री आणि रिक्त पदांमुळे बालमृत्यूच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यानुसार मागील तीन महिन्यात १७९ बालकांचा मृत्यू झाला आहे. या जिल्ह्यात ७० टक्के आदिवासी लोक राहत असून येथील वैद्यकीय सुविधा व्यवस्थित नसल्याचे उघडकीस आले आहे. राज्यभरात कुपोषित बालकांची संख्या २८ हजार असून त्यापैकी २३ हजार बालके ही नंदुरबार जिल्ह्यातील आहेत. याला राज्य सरकार जबाबदार आहे, असा आरोप ठाकरे गटाचे आमदार आमश्या पाडवी यांनी केला आहे.
नंदुरबार जिल्ह्यात कुपोषण आणि बालमृत्यूची समस्या गंभीर असून जिल्हा रुग्णालयातील सुविधा अपूर्ण आहेत. या रुग्णालयात असलेल्या लहान मुलांच्या अतिदक्षता विभागात २० जागांची क्षमता असताना ८४ बालके उपचार घेत असल्याचा गंभीर प्रकार आमदार पाडवी यांनी उघडकीस आणला आहे. जिल्हा रुग्णालयातील रिक्त पद आणि अपूर्ण सुविधा यामुळे जिल्ह्यातील बालमृत्यूचा प्रमाण वाढले आहे, असा आरोप पाडवी यांनी केला आहे.