नंदुरबार – नंदुरबारमध्ये वर्षा सहलीसाठी आलेल्या पर्यटकांची कार दरीत कोसळली. अक्कलकुवा तालुक्यात ही घटना घडली असून सुदैवाने यात कोणालाही दुखापत झाली नाही. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
राज्यभरात मुसळधार पाऊस कोसळत असून धरणे, धबधबे भरुन वाहत आहेत. त्यामुळे याठिकाणी वर्षा सहलीसाठी पर्यटक मोठी गर्दी करतात. सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये घाट रस्त्यांमध्ये वर्षा पर्यटनासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक हजेरी लावतात. अक्कलकुवा तालुक्यात असलेले घाट रस्ते ऑफ रोडिंग करणाऱ्या पर्यटकांसाठी आव्हानात्मक असते. त्यासाठी गुजरात, मध्य प्रदेश मधून मोठ्या प्रमाणात पर्यटक या भागात येतात.
नंदुरबारमध्ये वळंबा चिखली येथील घाटात एक थार गाडी दरीत कोसळली. दुर्घटनेत थार गाडीचा चक्काचूर झाला असला तरी सुदैवाने गाडीतील सर्व पर्यटक सुरक्षित आहेत. याप्रकरणी अक्कलकुवा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे. हे पर्यटक नेमके कुठले होते, याबाबतची माहिती अद्याप समोर आली नाही.