नंदुरबार – अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघातील ५ मतदान केंद्र ही अतिदुर्गम श्रेणीत मोडतात.त्यामुळे निवडणूक आयोगाने या पाच मतदान केंद्रांवरील मतदानाची वेळ २० नोव्हेंबर रोजी सकाळी ७ ते दुपारी ३ अशी निश्चित केली आहे,अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी दिली.
अक्कलकुवा विधानसभा मतदार संघातील नर्मदा काठावरील अतिदुर्गम (बार्जने जाणारे) मणीबेली, चिमलखेडी, बामणी, डनेल व मुखडी ही ५ मतदान केंद्र अत्यंत दुर्गम भागात असून सातपुडा पर्वत रांगेत नर्मदा काठावर आहेत. या मतदान केंद्रांवर पोहचण्यासाठी प्रथम रस्ते मार्ग, नंतर बोटीतून प्रवास करावा लागतो व त्यासाठी वेळही जास्त लागतो. मतदानानंतर परतताना देखील तेवढाच वेळ लागतो.त्यामुळे या मतदान केंद्रावर मतदान सकाळी ७ ते दुपारी ३ वाजेपर्यंत होणार आहे,यासाठी निवडणूक आयोगाने मान्यता दिलेली आहे, असेही डॉ.सेठी यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकाद्वारे म्हटले आहे.