वाई- गेल्या ५० वर्षांत कालव्यांच्या दुरुस्तीसाठी सरकारने निधीच उपलब्ध न केल्याने कालव्यांची अवस्था बिकट झाली आहे.अशाच धोम डाव्या कालव्यावर खानापूर व शेंदूरजणेला जोडणाऱ्या पुलाच्या भाग कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर कालव्यातील पाण्याचा विसर्ग आणि पुलावरील वाहतूक तत्काळ बंद करण्यात आली आहे.
धोम डाव्या कालव्यावर कवठे – केंजळ उपसा सिंचन योजनेलगत खानापूर व शेंदूरजणे या गावांना जोडणारा पूल आहे. मात्र रविवारी सकाळी या पुलाच्या खांबाचा काही भाग अचानक कोसळला.या पुलावरून शेंदूरजणे, खानापूर,निकम वस्ती,वाई आणि आजूबाजूच्या गावातील शेतकर्यांची वाहतूक सुरू असते.ही वाहतूक आता पुलाच्या खांबाचा भाग कोसळल्याने थांबविण्यात आली आहे. तसेच या पुलाच्या दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात येत असल्याची माहिती जलसंपदा विभागातून देण्यात आली.