चेन्नई – आयपीएलमध्ये आज धोनीच्या चेन्नई सुपर किंगने दिल्ली कॅपिटलचा 77 धावांनी मोठा पराभव करून मोठ्या दिमाखात प्लेऑफमध्ये प्रवेश केला. चेन्नईच्या या मोठ्या विजयामुळे मुंबईच्या प्लेऑफमध्ये जाण्याच्या आशा मावळल्या आहेत. गुजरात टायटन्स पाठोपाठ प्लेऑफमध्ये प्रवेश करणारा चेन्नई दुसरा संघ ठरला आहे.
नाणेफेक जिंकून चेन्नईने प्रथम फलंदाजी घेतली. कर्णधार धोनीचा हा निर्णय त्याच्या फलंदाजांनी चांगलाच यशस्वी करून दाखवला चेन्नईच्या सलामीच्या जोडीने 15 षटकात 141 धावांची मजबूत सलामी दिली. ऋतुराज गायकवाड याने 50 चेंडूत 7 षटकार आणि 3 चौकारांच्या सहाय्याने 79 धावा केल्या. त्याला चेतन साकार्याने बाद केले. तर दुसरा सलामीवीर कॉन्वे याने 52 चेंडूत 11 चौकार आणि 3 षटकार ठोकून 87 धावा केल्या. नॉर्टजेच्या गोलंदाजीवर त्याचा अमान खानने झेल घेतला. या दोघांच्या जबरदस्त फलंदाजीमुळेच चेन्नईला मोठी धावसंख्या उभारता आली. त्यानंतर मात्र दुबे 22, धोनी नाबाद 5 आणि जडेजा नाबाद 20 यांना फार काही करता आले नाही मात्र चेन्नईने 20 षटकात 3 बाद 223 अशी मोठी धावसंख्या उभारली . दरम्यान या धावसंख्येचा पाठलाग करताना दिल्लीची 5 बाद 109 अशी घसरगुंडी उडाली आणि तिथेच दिल्लीचा पराभव निश्चित झाला होता.
दिल्लीची सुरुवातच खराब झाली सलामीवीर पृथ्वी शॉला देशपांडेने 5 धावांवर माघारी धाडले. सॉल्ट 3 धावांवर परतला. रोषोला तर चहरने खातेही खोलू दिले नाही. धुल्ल केवळ 13 धावाच करू शकला. त्याला जडेजाने बाद केले. नेहमी फटकेबाजी करणार्या अक्षर पटेलचा चेन्नईच्या गोलंदाजांसमोर टिकाव लागला नाही. त्याला 15 धावांवर चहरने बाद केले ही पडझड सुरु असताना कर्णधार वार्नर मात्र एक बाजू नेटाने लढवत होता अखेर पथीराणाने त्याला 86 धावांवर बाद केले. आवेश खानलाही त्यानेच 7 धावांवर बाद केले. त्यानंतर अमान खान 7, ललित यादव 6 नॉर्टजे आणि कुलदीप यादव शून्य अशा तर्हेने चेन्नईने दिल्लीला 146 धावांमध्ये गुंडाळून 77 धावांनी सामना जिंकला आणि दिमाखात प्लेऑफमध्ये प्रवेश केला.