शिरपूर – मुंबईसाठी बसची वाट पहात थांब्यावर उभा असलेल्या तरूणाला भरधाव कारने धडक दिली.या अपघातात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर अन्य दोन तरूण जखमी झाले.
१८ ऑगस्ट रोजी रात्री साडेबारा वाजताच्या सुमारास मुंबई-आग्रा महामार्गावर शिरपूर तालुक्यात गरदाड फाट्यावर हा अपघात झाला.कुणाल सुधाकर पाटील (२६) असे अपघातात मरण पावलेल्या तरुणाचे नाव आहे. कुणाल हा पेशाने वकील होता.तो मुंबईला जाण्यासाठी येथे आला होता.खासगी ट्रॅव्हल्सच्या बसची तो वाट पहात होता.तेवढ्यात दहिवद येथून धुळ्याकडे जाणाऱ्या बोलेरो गाडीने त्याला धडक दिली.गंभीर जखमी झालेल्या कुणालला प्रथम उप जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.मात्र त्याची प्रकृती गंभीर झाल्याने त्याला धुळे येथे नेण्यात येत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला.
या अपघातात बस थांब्यावर उभे असलेले भूपेश मराठे आणि नीलेश सोनावणे हे दोन तरूण जखमी झाले. याबाबत सुरेश पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बोलेरो चालक गौरव नवसारे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.