पाटणा- धुळवड सण आणि रमजान महिन्यातील शुक्रवार (जुम्मा) एकाच दिवशी आल्याने बिहारमध्ये हिंदू-मुस्लीम यांच्यातील तेढ वाढली आहे. हिंदूंनी 14 मार्च रोजी दुपारी 12.30 ते 2 वाजेपर्यंत धुळवड खेळू नये, कारण 2 वाजता नमाज असतो असे आवाहन दरभंगाच्या महापौरांनी केले. यामुळे निर्माण झालेला वाद चिघळला आहे. हिंदू रंगांची धुळवड याच वेळेत खेळण्यावर ठाम असून मुस्लिमांनी दुपारी दोनऐवजी अडीच वाजल्यानंतर नमाज अदा करावी, असे हिंदूंचे म्हणणे आहे. मात्र नमाज किती वाजता अदा करावी हे ठरविण्याचा अधिकार फक्त जामा मशिदीच्या इमामांना आहे, अशी भूमिका मुस्लिमांनी घेतली आहे.
नितीश कुमार यांच्या जदयुच्या नेत्या अंजुम आरा या दरभंगा महानगरपालिकेच्या महापौर आहेत. गेले काही दिवस येथे धुळवड आणि जुम्म्याच्या नमाजावरून वाद सुरू आहे. अंजुम आरा यांनी काल निवेदन केले की जुम्म्याच्या नमाजाची वेळ पुढे ढकलली जाऊ शकत नाही त्यामुळे हिंदूंनी साडेबारा ते दोन वाजेपर्यंत धुळवड खेळू नये. या विषयी वाद व्हावा अशी कोणत्याही पक्षाची इच्छा नाही. मात्र दोन-चार समाजकंटक विनाकारण वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.त्यांच्यावर प्रशासनाची करडी नजर आहे. कुठेही अनुचित प्रकार होऊ दिला जाणार नाही,असे अंजुम आरा म्हणाल्या. परंतु नमाजाची वेळ बदलण्याचा निर्णय अजून घेतला नसल्याने धुळवड दिवशी काय होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
बांके बिहारीचे कपडे मुस्लिमांनी बनवू नये
मथुरेतील श्री कृष्णजन्मभूमी मंदिरातील बांके बिहारी अर्थात भगवान श्रीकृष्णाच्या मूर्तीला मुस्लीम कारागिरांनी तयार केलेले पोषाख घालू नयेत,अशी मागणी न्यासाचे अध्यक्ष पंडित दिनेश फलाहारी यांनी केल्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
दिनेश फलाहारी हे श्रीकृष्ण जन्मभूमी-ईदगाह मशिद खटल्यातील हिंदू पक्षकारही आहेत. त्यांनी न्यासाच्या विश्वस्तांना पत्र लिहून ही मागणी केली आहे. भगवान श्रीकृष्णाचा पोषाख हा शुद्धतेचे प्रतिक असावा.जे आपल्या देवाला मानत नाहीत, गोमातेची हत्या करून मांस खातात अशा लोकांच्या हातांनी बनवलेली वस्त्र आपण स्वीकारता कामा नये,असे फलाहारी यांनी पत्रात म्हटले आहे. संपूर्ण ब्रजमंडळातील बहुतांश मंदिरात देवाची विधिवत पूजा केली जाते. ही पूजा शुद्धतेचे एक प्रतिक आहे.जे आपल्या देवाला मानत नाहीत, आपल्या धर्माला मानत नाहीत त्यांच्या हातून कोणतीही वस्तू देवाच्या मूर्तीला वाहणे हे घोर पाप ठरते,असेही फलाहारी पत्रात म्हणतात.
धुळवड थांबवायची की नमाज पुढे ढकलायचा! बिहार राज्यात तणाव! माघार कोण घेणार?
