नवी दिल्ली – उत्तर भारतात गेल्या काही दिवसांपासून थंडीची लाट सुरु असून त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात धुके दाटले आहे. या धुक्यामुळे दिल्ली मेरठ मार्गावर अनेक गाड्या एकमेकांना धडकून झालेल्या अपघातात सहापेक्षा अधिक लोक जखमी झाले आहेत. त्यांना दिल्लीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातात अनेक गाड्यांचे नुकसान झाले आहे.मोदीपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिल्ली मेरठ एक्सप्रेस हायवेवर आज सकाळी हे अपघात झाले. धुक्यामुळे एका गाडीला अचानक ब्रेक लावावे लागल्यानंतर पाठीमागून आलेल्या गाड्या त्यांच्यावर धडकल्या. या मार्गावर अनेक ठिकाणी धुक्याने गाड्या धडकल्यामुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली. पोलिसांनी तातडीने मदत करुन वाहने बाजूला करुन वाहतूक कोंडी सोडवली असून लोकांनी वाहने सावकाश हाकण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. वाहनांना फॉग लाईट लावण्याच्या व पाठीमागील दिवेही सुरु ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
धुक्यामुळे दिल्ली मेरठ मार्गावर अनेक गाड्या आपापसात भिडल्या
