रत्नागिरी- धावत्या एसटी बसमध्ये अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने बसवाहकाचा मृत्यू झाल्याची घटना जिल्ह्यातील करजुवे- देवरुख दरम्यान घडली. तुकाराम कुंडलिक माने (४२)असे या मृत्यू झालेल्या वाहकाचे नाव आहे.
एसटी चालक बालाजी मनोहर कोपनर आणि वाहक तुकाराम माने यांनी मंगळवारी दिवसभर संगमेश्वर ते करजुवे अशा फेऱ्या मारल्या. सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास ते संगमेश्वर येथून करजुवे वस्तीची बस घेऊन गेले होते. बुधवारी सकाळी सव्वा सहा वाजता ही बस करजुवे येथून प्रवासी घेऊन संगमेश्वरकडे निघाली. थोड्याच अंतरावर भायजेवाडी मार्गे घारेवाडी येथे वाहक तुकाराम माने चक्कर येऊन खाली पडल्याचे एका प्रवाशाने बसचालकाला सांगितले. चालकाने बस रस्त्याच्या बाजूला उभी करून तुकाराम मानेकडे विचारपूस केली. त्याने अस्वस्थ वाटत असल्याचे आणि छातीत दुखत असल्याचे सांगितले. चालक कोपनर यांनी वेळ न घालवता प्रवाशांची मदत घेत थेट संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयाकडे बस नेली. तेथे वाहकाला उपचारासाठी दाखल केले. मात्र तोवर तुकाराम याची प्राणज्योत मालवली होती. बीड जिल्ह्यातील तुकाराम माने हे २०१८ साली वाहक कम चालक म्हणून देवरुख आगारात रुजू झाले होते. दोन मुलगे आणि पत्नीसह ते देवरुखमध्ये राहत होते.