-पार्ल्यातील संस्थेचा ‘मराठीचा जाहीरनामा’
मुंबई
पार्ल्यातील पार्ले पंचम या संस्थेने विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर मराठीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. या जाहीरनाम्यात सात मागण्या केल्या आहेत. त्यात धारावी प्रकल्पात मराठी माणसासाठी ७० ते ७५ टक्के घरे राखीव ठेवण्याच्या मागणीचा समावेश आहे. मुंबईतील मराठी टक्का घसरत चालला असून मुंबईत घर घेणे मराठी माणसाला परवडेनासे झाले आहे. त्यामुळे मुंबईत मराठी टक्का घसरू नये म्हणून प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्या पक्षालाच मतदान केले पाहिजे अशी भूमिका पार्ले पंचम या संस्थेने घेतली आहे. आपल्या मागण्यांचा विचार करून जाहीर भूमिका मांडावी असे आवाहनही या पक्षाने केले आहे.
नवीन इमारतीत घरांचे बुकिंग सुरू झाल्यानंतर एक वर्षांपर्यंत मराठी माणसांसाठी घरांचे ५० टक्के आरक्षण ठेवावे. प्रत्येक नवीन इमारतीत २० टक्के फ्लॅट हे लहान आकाराचे असावेत. हे छोटे फ्लॅट मात्र १०० टक्के एक वर्षांपर्यंत १०० टक्के मराठी माणसांसाठी आरक्षित असावेत. मुंबईत अनेक गृहनिर्माण संस्थेत अमराठी लोक मराठी माणसांवर अन्याय करत असतात, अशा प्रकरणात मराठी माणसांना त्वरेने न्याय मिळावा. मुंबईत होत असलेल्या मेट्रो स्थानकांना मराठी लेखक, कवी, कलाकार, संगीतकार यांची नावे द्यावीत. मराठी तरुणांसाठी औद्योगिक वसाहती बांधून त्यात त्यांना गाळे उपलब्ध करून द्यावेत. सरकारने त्यासाठी मार्गदर्शन केंद्र उभारून सढळ हस्ते अनुदान द्यावे, अशा मागण्या पार्ले पंचमने केल्या आहेत.