धरणाच्या पाण्यात पडून मत्स्य अधिकाऱ्याचा मृत्यू

  • चौघे बचावले

वर्धा

मत्स्योद्योग विभागाच्या एका अधिकाऱ्याचा धरणाच्या पाण्यात पडून मृत्यू झाला. बोरधरण परिसरात तपासणी करण्यासाठी मत्स्योद्योग विभागाचे एक अधिकारी आणि चार कर्मचारी गेले होते. यावेळी त्यांची अपघात झाला. यात मत्स्योद्योग विभागाचे अधिकारी युवराज खेमचंद फिरके (५३) यांनी आपले प्राण गमावले, तर इतर कर्मचारी थोडक्यात बचावले.

ही घटना सेलू तालुक्यातील बोरधरण परिसरात शनिवारी घडली. फिरके यांच्यासोबत मत्स्य निरीक्षक सुनिल भिमराव ठाकरे (५७), विभागीय व्यवस्थापक बंसी योगीराम गहाट (५८), मयंक विजयसिंग ठाकूर (४०), सहायक मत्स्य विकास अधिकारी योगेश मोहनलाल कठाणे (३४) हे तपासणीसाठी गेले होते. रात्री सुमारे ८ नंतर त्यांनी तपासणीला सुरुवात केली. तासाभरात तपासणी करुन परत जाताना बोटीवरून प्लॅटफॉर्मवर उतरतेवेळी तेथील प्लास्टिकच्या ड्रमवरुन पाचही जणांचा पाय घसरून ते नदीपात्रात पडले. चौघांनी जवळच असलेल्या दोरीला पकडल्यामुळे त्यांचा जीव वाचला, मात्र फिरके खोल पाण्यात बुडाल्याने त्यांचा मृत्यू झाला. रात्री उशिरापर्यंत पाण्यात खोलवर अडकलेला मृतदेह बाहेर काढण्याचे प्रयत्न करण्यात आले, मात्र काळोख असल्याने शोध लागला नाही. घटनास्थळी सेलू पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक तिरुपती राणे हे रात्री कर्मचाऱ्यांसह दाखल झाले. रविवारी सकाळी नागपूर येथील राज्य आपत्ती निवारण दलाच्या चमूंनी पाण्यात शोध सुरू केला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top