धरणांत ३६ टक्के पाणीसाठा शेतकऱ्यांसह उद्योजक चिंतेत

पुणे –

राज्यातील धरणांमध्ये जवळपास ३६ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. विशेष म्हणजे, पुणे विभागात सर्वात कमी म्हणजे केवळ २८. ८३ टक्के पाणीसाठा उपलब्ध असल्याचे समोर आले. त्यामुळे उन्हाळ्याच्या अखेरच्या टप्प्यात या भागातील शेतीसह उद्योग-व्यवसायांना पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर उन्हामुळे पाण्याचे बाष्पीभवनदेखील वाढत असल्याने, आत्तापासूनच पाण्याचे नियोजन करण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे.

राज्यात सध्या १३९ मोठ्या, २५९ मध्यम आणि २६०५ लहान अशा एकूण ३००३ धरणांमध्ये मिळून एकूण २२३५०. १४ दशलक्ष घनमीटर (७८९ टीएमसी) पाणीसाठा उपलब्ध आहे. उपलब्ध पाणीसाठ्याचे हे प्रमाण ३६.६४ टक्के इतके आहे. गेल्यावर्षी याच तारखेला हा पाणीसाठा ३७.३९ टक्के होता. यावरून यंदा पाणीसाठा काहीसा कमी असल्याचे स्पष्ट होते. त्यातच यंदा पाऊस कमी होणार असल्याचा अंदाजदेखील वर्तवला जात आहे. राज्यातील अनेक भागात आत्तापासूनच पाणी टंचाई जाणवत आहे. त्यामुळे अनेक गाव आणि वस्त्यावर पिण्याच्या पाण्यासाठी टँकरचे नियोजन करावे लागत आहे. सध्या राज्यातील २३५ गावांत आणि ६०६ वाड्यांवर एकूण १८४ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. ज्यात ४३ शासकीय आणि १४१ खाजगी टँकरचा समावेश आहे. मुंबई विभागात १००, नाशिक विभागात ३७, पुणे विभागात २६, छत्रपती संभाजीनगर ५, अमरावती विभागात १६ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top