पुणे – द केरळ स्टोरी` चित्रपट पाहण्यासाठी जाणाऱ्या लोकांना पुण्यातील रिक्षाचालक साधू मगर यांनी मोफत रिक्षा प्रवासाची सोय दिली होती. त्यामुळे काही कट्टरपंथींनी त्यांचा शिरच्छेद करण्याची धमकी दिली आहे. राजस्थानच्या कन्हैयालालसारखी तुमची परिस्थिती करु, अशी धमकी त्यांना मोबाईलवर कॉल व मेसेज करून देण्यात आली आहे. याप्रकरणी त्यांनी पोलिसांत तक्रार केली आहे.
साधू मगर यांनी २ मे रोजी ‘द केरळ स्टोरी` पाहण्यासाठी जाणाऱ्या लोकांकडून पैसे न घेण्याची घोषणा करणारे पोस्टर बनवले होते. त्यांना आता कट्टरपंथीकडून त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. धमकी येणारे नंबर ब्लॉक करूनही त्यांना वेगवेगळ्या नंबरवरून कॉल येत आहे. साधू मगर यांनी याप्रकरणी पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानी धमक्यांचे कॉल रेकॉर्डिंगही पोलीस अधिकाऱ्यांना दिले आहे. पोलिसांना दिलेल्या लेखी तक्रारीत त्यांना १५ वेगवेगळ्या नंबरवरून कॉल आल्याचे म्हटले आहे. तक्रारीत त्यांनी व्हॉट्सॲपचे काही स्क्रीनशॉटही दिले. साधू मगर यांनी सांगितले की, धमकी देणाऱ्यांनी आपल्याला उदयपूरच्या कन्हैयालालची आठवण करून दिली आहे.