कोलकाता – विपुल शाह यांची निर्मिती असलेल्या ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटावर सध्या अनेक संघटनांनी बंदी घालण्याची मागणी केली आहे, तर काहींनी चित्रपटाला पाठिंबा दर्शवला. काही राज्यांत हा चित्रपट टॅक्स फ्री करण्यात आला, तर काहींनी मात्र त्याच्या प्रदर्शनावर बंदी घातली. आधी तामिळनाडूमध्ये या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्यात आली. आता त्या पाठोपाठ ममता बॅनर्जी सरकारनेही चित्रपटावर बंदी आणली आहे. प. बंगालमध्ये हा चित्रपट प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी एका पत्रकार परिषदेत या चित्रपटावर आपला संताप व्यक्त केला आहे. हा चित्रपट म्हणजे एका वर्गाचा अपमान करणे आहे. ‘केरळ स्टोरी’ म्हणजे काय? ही एक विकृत कथा असल्याचे स्पष्ट करत पश्चिम बंगाल सरकारने राज्यात ‘केरळ स्टोरी’ बंदी घातली आहे. द्वेष आणि हिंसाचाराची कोणतीही घटना टाळण्यासाठी आणि राज्यात शांतता राखण्यासाठी उचलल्याचे हा निर्णय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ही कथा रचलेली असल्याचे सांगून त्यांनी या चित्रपटावर बंदी घालण्याची घोषणा केली.