कोलकाता
वादग्रस्त ठरलेल्या ‘द केरला स्टोरी’ चित्रपटावर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बंदी घातली होती. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेल्यानंतर न्यायालयाने ही बंदी उठवली. चित्रपटगृह मालकांनी प्रेक्षकांना पोलीस सुरक्षा देऊन हा चित्रपट सुरू ठेवावा, असा आदेश न्यायालयाने दिला. मात्र तृणमूल काँग्रेसचा धसका घेतलेले पश्चिम बंगालमधील चित्रपटगृह मालक भीतीपायी सर्वोच्च न्यायालयाचा आदेश जुमानत नाहीत. त्यामुळे ‘द केरला स्टोरी’ चे राज्यातील चित्रपटगृहातील शो बंद आहेत.
यावर प्रतिक्रिया देताना भाजपने तृणमूल काँग्रेसवर सर्वोच्च न्यायालयाचा अपमान केल्याचा आरोप केला आहे. भाजपाच्या आयटी विभागाचे प्रमुख अमित मालवीय यांनी याबाबत ट्विट केले आहे की, सर्वोच्च न्यायालयाने पश्चिम बंगालमधील ‘द केरला स्टोरी’ वरील बंदी उठवल्यानंतरही राज्याची राजधानी कोलकातामधील एकाही चित्रपटगृहात हा चित्रपट प्रदर्शित होत नाही. स्थानिक प्रशासनाकडून चित्रपटगृह मालकांना दंडात्मक कारवाईची धमकी दिली जात आहे.