पुणे- दौंड तालुक्याच्या दक्षिण भागात यंदा अत्यल्प पाऊस पडल्याने शेतकरी आणि मेंढपाळ हवालदिल झाले आहे. त्यांनी शेळ्या-मेंढ्यासह स्थलांतर केले आहे. हे मेंढपाळ प्रामुख्याने कोकण आणि मावळ भागात चारा-पाण्यासाठी स्थलांतरित होत आहेत.
दौंडच्या दक्षिण भागातील खोर आणि देऊळगावगाडा या भागातील मेंढपाळ दिवाळी पासूनच कोकणाकडे गेले आहेत. वास्तविक हे मेंढपाळ फेब्रुवारी ते मार्च या काळात स्थलांतर करत असतात. परंतु यंदा नोव्हेंबरमध्येच त्यांनी स्थलांतर केले आहे. या मेंढपाळांनी आपल्यासोबत शेळ्या-मेंढ्या,घोडे,कोंबड्यांसाठी खुराडे आणि मुक्कामासाठी तंबू घेतला आहे. आता पुढील सात महिने तरी चारा-पाणी मिळेल तिथे या मेंढपाळांची भटकंती होणार आहे.