दोन दिवसांत भूकंप? राष्ट्रवादीत फूट पडणार 10 आमदार तयार! शपथविधी सूर्याच्या साक्षीने

मुंबई – राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार मागील काही दिवसांपासून नाराज असल्याची चर्चा राज्यात सुरू आहे. राष्ट्रवादीत काही आलबेल नसल्याच्याही चर्चा रंगत आहे. या चर्चांना रोज अधिक बळ मिळत आहे. अजित पवार यांनी आज अचानक आपला पुण्यातील नियोजित दौरा रद्द केला. यामुळे राष्ट्रवादीत येत्या दोन दिवसांत फूट पडणार असल्याची चर्चा आहे. दहा आमदार सीमा ओलांडण्याच्या तयारीत आहेत. पक्षातील नाराजीपेक्षा ईडी, सीबीआय आणि अटकेच्या भीतीने ही ज्येष्ठ नेत्यांची फळी निर्णयापर्यंत पोहोचली आहे. त्यांची ही स्थिती मविआच्या नेत्यांपासून लपलेली नाही. अंतिम खिळा ठोकण्यासाठीच अमित शहा दौर्‍यावर आल्याची चर्चा आहे. येत्या दोनच दिवसात हा राजकीय भूकंप होणार असल्याचे बोलले जात आहे.
पुरंदरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला शरद पवार, सुप्रिया सुळे यांचीही उपस्थिती होती. मात्र अजित पवारांनी पुरंदर दौरा अचानक रद्द केला. त्यांचा नियोजित दौरा त्यांनी रद्द केला. त्यामुळे आता राज्यात नवा भूकंप होणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. पुरंदर येथील कार्यक्रमात अजित पवार उपस्थित राहणार असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जय्यत तयारी केली होती. अजित पवार यांचे फोटो असलेले बॅनर्सही संपूर्ण परिसरात लागले होते. रातोरात अचानक असे काय घडले की, अजित पवार यांनी त्यांचा नियोजित दौरा रद्द केला, याचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. अजित पवार यांच्याऐवजी शरद पवार आणि सुप्रिया सुळे आता या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. नागपूरच्या सभेनंतर जखमींची विचारपूस करून काल रात्री अजित पवार हे एकटेच खासगी गाडीने निघाले होते, अशा बातम्या समोर आल्या आहेत. अजित पवार यांनी महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात उष्माघाताचा तडाखा बसलेल्या रुग्णांची मध्यरात्री रुग्णालयात जाऊन विचारपूस केली. त्यामुळे सोमवारचा दौरा रद्द करण्यात आला, असे स्पष्टीकरण कार्यालयातून देण्यात आले. मात्र हे स्पष्टीकरण मान्य होण्यासारखे नाही.
राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या शिस्तीचे आणि वक्तशीरपणाचे अनेक किस्से आहेत. कार्यक्रम कधीही असला तरीही ते वेळेत हजर असतात. त्यामुळेच दादा सोमवारी होणार्‍या विकासकामांच्या उद्घाटनासाठी गेले नाहीत हे आश्चर्यकारक आहे. काही दिवसांपूर्वी अजित पवार हे तब्बल 17 तास नॉट रिचेबल होते. नंतर ते एका ज्वेलरी शोरूमच्या उद्घाटनाला पोहोचले. त्यावेळी त्यांनी म्हटले की, मला पित्ताचा त्रास होत असल्याने मी आराम करण्यास घरी गेलो.आराम केल्यानंतर मला बरे वाटले आणि पुन्हा सकाळपासूनचे कार्यक्रम सुरू केले. मात्र अचानक ते गायब झाल्यानंतर संपूर्ण राज्यात त्यांच्या नाराजीच्या चर्चांना सुरुवात झाली. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अजित पवार भाजपाबरोबर जाणार असल्याचे ट्वीट केले होते. त्यामुळे अजित पवार हे राज्यातील राजकारणातील केंद्रबिंदू ठरले. नागपूर येथे रविवारी झालेल्या महाविकास आघाडीच्या सभेत अजित पवार यांचे भाषण झाले नाही.सोमवारी पुणे जिल्ह्यातील सासवड, पुरंदर येथील नियोजित दौरा रद्द केला. लागोपाठ ठरलेल्या या घटनांमुळे राष्ट्रवादीत सारे काही ठीक नसल्याच्या चर्चांना अधिक बळ
मिळत आहे. अजित पवार यांच्या बहिणींच्या घरी ईडीने छापा टाकला होता. त्यांच्या मामेभावाच्या घरीही ईडीने छापेमारी केली. सरकारी चौकशी सुरू असतानाच ईडीने जरंडेश्वर साखर कारखान्याच्या चौकशीतून अजित पवार आणि त्यांच्या पत्नीचे नाव वगळले. ही चौकशी थांबवण्यासाठी अजित पवार राष्ट्रवादीतून फुटू शकतात, असेही बोलले जाते. दरम्यान अजित पवार आणि अमित शहा यांच्यात भेट झाल्याचेही बोलले जात आहे. दुसरीकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि आशिष शेलार हे दिल्लीला पोहोचले. बावनकुळेंचा अचानक दिल्ली दौरा आणि दुसरीकडे अजित पवार यांनी सासवडमधील सर्व कार्यक्रम स्थगित केल्याने चर्चेला उधाण आले आहे. राज्यात आणि दिल्लीत नवा राजकीय भूंकप घडू शकतो का? असा प्रश्न निर्माण होत आहे. यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. शिवसेना तोडली तसा राष्ट्रवादीमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र अजित पवार कुठेही जाणार नाहीत. त्यांच्या सोबत आमचा संवाद सुरू आहे, असेही राऊत
म्हणाले. पहाटेच्या शपथविधी नंतर अजित पवार यांच्या प्रत्येक हालचालींवर बारीक लक्ष ठेवले जाते. दादांच्या मनात नेमके काय सुरू आहे, असा प्रश्व निर्माण होत आहे. राष्ट्रवादीतही गटबाजी आहे अशा चर्चा असतात. जयंत पाटील आणि अजित पवार असे दोन गट आहेत. अजित पवार यांनी राजकीय महत्त्वाकांक्षा वेळोवेळी जाहीर केली. शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील मतभेद अनेकदा दिसून येतात. त्यामुळे अजित पवार वेगळा संसार थाटणार का? या प्रश्नाचे उत्तर येत्या दोन- तीन दिवसांमध्ये राज्याला मिळेल. आता दादा नाराज असल्याने शिंदे गटातील अनेक नेत्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिली आहे. शिंदे गटाचे आमदार शंभूराज देसाई यांनी या संदर्भात भाष्य केले. भारतीय जनता पार्टी आणि आमचे 200 प्लस जागा जिंकण्याचे टार्गेट सेट आहे. त्यात अजित पवारांसारखे कोणी येत असेल तर त्यांचे स्वागतच आहे. अजित पवार भाजपात आल्यावर स्वागत करणार का, असे विचारल्यावर चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, देव, देश आणि धर्म ही आमची काम करण्याची पद्धत आहे. कालपर्यंत कोणत्या विचारधारेत होते, माहिती नाही. पण, भाजपमध्ये आल्यावर आमच्या विचारधारेच्या आधारावरच काम करावे लागते. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचा संकल्प आम्हाला पूर्ण करावा लागतो. त्यामुळे आमच्या विचारधारेशी सहमत असाल, तर आमचा विरोध नाही. अजित पवारांसोबत बरेच आमदार असून, कोणतेही लग्न व्हायचे असेल तर तिथीची गरज नसते. मात्र, त्यासाठी अजून कुळ बघावे लागेल. गुण जुळवावे लागतील. नंतरच ते काम करावे लागेल असे सूचक वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top