नवी दिल्ली – दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी तिहार तुरुंगातून देशाला पत्र लिहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिक्षणावर प्रश्न उपस्थित केले असून भारताच्या प्रगतीसाठी सुशिक्षित पंतप्रधान असणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सिसोदिया यांचे पत्र ट्विटरवर शेअर केले आहे.
दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया हे सध्या दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणात तिहार तुरूंगात आहेत. या दरम्यान, सिसोदिया यांनी तुरुंगातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून देशवासियांना पत्र लिहिले आहे. या पत्रात सिसोदिया यांनी पंतप्रधान कमी शिकलेले असणे देशासाठी अत्यंत धोकादायक असल्याचे म्हटले आहे. सिसोदिया यांनी देशाला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, मी पंतप्रधानांचा एक व्हिडिओ पाहिला ज्यामध्ये ते अभिमानाने सांगत आहेत की ते फार शिकलेले नाहीत, त्यांचे शिक्षण फक्त गावातील शाळेत झाले आहे. अशिक्षित किंवा कमी शिक्षित असणे ही अभिमानाची गोष्ट आहे का? त्यांनी पुढे लिहिले, ज्या देशाचे पंतप्रधान कमी शिक्षित असल्याचा अभिमान बाळगतात, त्यांच्याकडून सामान्य माणसासाठी कधीही चांगल्या शिक्षणाची व्यवस्था केली जाणार नाही. आज आपण 21व्या शतकात जगत आहोत. जगभरात विज्ञान आणि तंत्रज्ञानात रोज नवनवीन प्रगती होत आहे. अशा परिस्थितीत पीएम मोदींना विज्ञानाच्या गोष्टी समजत नाहीत. त्यामुळे भारताची प्रगती आणि समृद्धीसाठी सुशिक्षित पंतप्रधान असणे, अत्यंत आवश्यक आहे.
देशाला सुशिक्षित पंतप्रधान हवा!