नवी दिल्ली – देशात यंदा मोसमी पावसामुळे घडलेल्या विविध घटनांमध्ये दीड हजार जणांचा मृत्यू झाला आहे. यंदा सरासरीपेक्षा ८ टक्के अधिक पाऊस झाला असून २०२० नंतरचा हा विक्रमी पाऊस असल्याचे हवामान विभागाने जारी केलेल्या अहवालात म्हटले आहे. १ जून ३० सप्टेंबर या कालावधीत झालेल्या पावसाच्या आधारावर हा अहवाल जारी करण्यात आलेला आहे.
यंदा मुसळधार पाऊस व अतिवृष्टीमुळे देशभर घडलेल्या विविध घटनांमध्ये १४९२ लोकांचा मृत्यू झाला. पूर व पावसामुळे ८९५ जणांना जीव गमवावा लागला असून वादळामुळे व वीज पडून ५९७ जणांचा मृत्यू झाला आहे. या पावसाळ्यात अतिवृष्टीच्या ५२५ घटना घडल्या असून गेल्या ५ वर्षातील हा उच्चांक आहे. हवामान खात्याने यंदा १०६ टक्के पावसाचा अंदाज वर्तवला होता. मात्र त्यापेक्षा अधिक पाऊस झाला. यंदा मध्यप्रदेशात सर्वाधिक पाऊस झाला असून बिहारमध्ये सर्वात कमी पाऊस झाला. उत्तर प्रदेशातही तुलनेने कमी पाऊस झाला. देशातून १५ ऑक्टोबर पासून मान्सून परतीच्या वाटेवर असून नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यापासून थंडी पडेल. या काळात ला निना तयार होण्याची शक्यता असून त्यामुळे यंदा अधिक थंडी पडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
देशात यावर्षी पावसामुळे १५०० जणांचा मृत्यू
