नवी दिल्ली – देशातील अनेक भागात मोसमी पाऊस शेवटच्या षटकात जोरदार बॅटिंग करीत आहे. जाता जाता देशातील उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान या भागात जोरदार पाऊस झाला. आसाममध्ये मात्र उष्णतेच्या लाटेमुळे शाळा बंद ठेवण्यात आल्या.उत्तर प्रदेशातील २१ जिह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली असून कानपूर जिल्ह्यातील १३ गावांमध्ये पांडू नदीचे पाणी शिरले आहे. बिहारमध्ये १२ जिल्हयांना पुराचा फटका बसला. देशात मान्सून काढता पाय घेत असून राजस्थानातील अनुपगड, बिकानेर, जोधपूर तसेच गुजरात मधील भुज आणि द्वारका मध्ये पाऊस थांबला आहे. मेघालयात यंदा पावसाळ्याने सरासरी गाठली नाही. पुढील दोन दिवसात आसाम, मेघालय, मध्य महाराष्ट्र व गुजरामध्ये मुसळधार पावसाची शक्यता असून उत्तराखंड, मध्य प्रदेश, महाराष्ट्रातील विदर्भाचा भाग, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, सिक्कीम, बिहार, झारखंड, ओडिशा, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा आणि कर्नाटकाच्या किनाऱ्यालगतच्या भागात मध्यम ते हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये होत असलेल्या भीषण वृक्षतोडीमुळे तसेच जागतिक तापमान वाढीमुळे पावसाच्या प्रमाणात ही असमानता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. राजस्थानमधील २४ जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे. अनेक भागात उद्यापासून २७ सप्टेंबर पर्यंत शेवटचा पाऊस पडण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे. हरियाणातील कुरुक्षेत्र मध्ये पारा चढा राहिला. पंजाबमधील तापमानही ३८ अंश सेल्सिअसवर पोहोचले.
देशात मोसमी पावसाचा कहर आसामात मात्र उष्णतेची लाट
