नवी दिल्ली :- भारतात नव्या एचथ्रीएनटू इन्फ्लूएंझा विषाणूच्या संसर्गाने चिंता वाढली आहे. यामुळे गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याचे आवाहन नीती आयोगाने केले आहे. एचथ्रीएनटू इन्फ्लूएंझाचा वाढता धोका पाहता केंद्रीय आरोग्य मंत्रालय अलर्टवर आहे. नीती आयोगाने कोविड टास्क फोर्स, केंद्रीय आरोग्य सचिव, राज्य आरोग्य अधिकाऱ्यांची बैठक आज महत्त्वाची बैठक पार पडली. केंद्राने राज्यांना पत्र लिहीत कोविड प्रोटोकॉलचे पालन करा आणि मास्क वापरा, असा सल्ला दिला आहे. राज्यांनी आवश्यक औषधांचा पुरेसा साठा सुनिश्चित करावा, रुग्णांचे बारकाईने निरीक्षण करावे, असे देखील सांगण्यात आले.
एचथ्रीएनटूच्या व्हायरसचे देशभरात एकूण ९० रुग्ण आढळून आले आहेत. तर कर्नाटक आणि हरयाणात प्रत्येकी एक असे २ बळी गेले आहेत. या आजाराची लक्षणे काय आहेत आणि त्यापासून स्वतःचा बचाव कसा कराल, याबाबत इंडियन काऊन्सिल मेडिकल रिसर्चने माहिती दिली. ताप, थंडी, खोकला, मळमळ, उलटी, घशात दुखणे, अंगदुखी, सर्दी, वाहणारे नाक, श्वास घ्यायला त्रास, छातीत अस्वस्थ वाटणे, काही प्रकरणात डायरिया ही याची लक्षणे आहेत. एका व्यक्तीमार्फत दुसऱ्या व्यक्तीपर्यंत हा व्हायरस तोंड किंवा नाकातून निघणाऱ्या थेंबांमार्फत किंवा व्हायरस असलेल्या पृष्ठभागाच्या संपर्कात आल्यास पसरतो. साबण आणि पाण्याने हात धुवा, मास्कचा वापर करा, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा, शिंकताना-खोकतना तोंड-नाक झाकून घ्या, डोळे आणि नाकाला स्पर्श करू नका.