नवी दिल्ली
बदलत्या वातावरणामुळे शेतकरी अस्वस्थ आहेत. अशातच अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे आंबा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. ओडिशा, उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये आंबा पिकांची नासाडी झाली आहे. त्यामुळे शेतकरी सरकारकडे नुकसान भरपाईची मागणी करत आहेत.
उत्तर प्रदेशातील चित्रकूटमधील आंबा बागांवर पाऊस आणि गारपिटीचा मोठा परिणाम झाला. या हंगामात चित्रकूटमधील आंब्याच्या झाडांना मोहोर येत असल्याचे कृषी तज्ज्ञांनी सांगितले. मात्र, बदलत्या आणि खराब हवामानामुळे आंब्याच्या मोहोर गळून पडला. पावसामुळे निर्माण झालेल्या ओलाव्याने आंबा पिकावर रोगराई आली. यात चार ते पाच लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे स्थानिक शेतकऱ्यांनी सांगितले. ओडिशातही आंब्याच्या बागांवर अवकाळीचा परिणाम झाला. राज्यातील कोरापूट जिल्ह्यात ७० टक्के आंबा वाया गेला. त्यामुळे व्यापारी परराज्यातून मोठ्या प्रमाणात आंब्याची आयात करत आहेत. कुंद्रा, दशमंतपूर, जेपोर, बोरीगाम्मा, सेमिलीगुडा आणि लक्ष्मीपूर भागातही आंबा पिकाला मोठा फटका बसला.
दरम्यान, यंदा राज्यात कमी उत्पादन अपेक्षित असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे असल्याने पश्चिम बंगाल, छत्तीसगड, आंध्र प्रदेशातील व्यापारीही आंबा खरेदी करत आहेत. मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये अवकाळी पावसामुळे फळबागांसह रब्बी पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामध्ये आंबा, द्राक्ष, केळी, संत्रा या फळबागांसह गहू, हरभरा, मका, मोहरी, ज्वारी या पिकांचा समावेश आहे. तसेच भाजीपाला पिकालाही फटका बसला आहे.