दिल्ली – देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये सध्या जोरदार पाऊस सुरु आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. दिल्लीसह उत्तर प्रदेशातील अनेक नद्यांना पूर आल्यामुळे गावांचा संपर्क तुटला आहे. या ठिकाणी पूरचौक्या स्थापन करण्यात आलेल्या आहेत. त्याचबरोबर एनडीआरएफच्या तुकड्या तैनात करण्यात आल्याची माहिती उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पूरग्रस्त भागाची हवाई पाहणी केल्यानंतर दिली.राजधानी दिल्लीतील अनेक भागात आज जोरदार पाऊस पडला. त्यामुळे तापमान घटल्याने लोकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. बिहारमधील अनेक भागात पावसाचा जोर कायम आहे. बिहारमध्ये राजधानी पटना सह अनेक भागात पावसाची संततधार सुरु असून राज्यातील चंपारण, गोपालगंज, किशनगंज, शिवहर या जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. सारण, मुजफ्फरपुर, सीतामढी, दरभंगा, पूर्णिया या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड या राज्यातही पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. देशाच्या उत्तर भागात येत्या काही दिवसांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.