बीड- मस्साजोगचे हत्या झालेले सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख आणि मुलगी वैभवी देशमुखने आज
भगवानगडावर जाऊन नामदेवशास्त्री यांची भेट घेतली. धनंजय मुंडे यांना नारायणशास्त्री यांनी जाहीर पाठिंबा दिल्याने खळबळ माजली होती. त्यानंतर सत्य सांगण्यासाठी देशमुख कुटुंबाने आज ही भेट घेतली.
धनंजय देशमुख यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील पुरावे नामदेवशास्त्रींना दाखवले. हत्येमागील खरे कारण, आरोपींचा गुन्हेगारीचा इतिहास, त्यांची गुंडगिरी, खंडणीचे प्रकार अशी सर्व माहिती त्यांना दिली. आम्ही आरोपींना पाठीशी घालणार नाही. भगवानगड देशमुख कुटुंबियांच्या कायम पाठीशी राहील, असे आश्वासन देत नामदेवशास्त्री यांनी आपल्या आधीच्या वक्तव्यावरून माघार घेतली.
भगवान गडाचे महंत नामदेवशास्त्री यांनी पत्रकार परिषद घेत मंत्री धनंजय मुंडे यांची पाठराखण केली होती. त्यामुळे संतोष देशमुख कुटुंब नाराज झाले होते. दोन्ही बाजू समजून न घेता नामदेवशास्त्री यांनी धनंजय मुंडे यांच्या बाजूने वक्तव्य करणे चुकीचे आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे आमच्या भावना दुखावल्या आहेत, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली होती. त्यानंतर भगवान गडावर जाऊन नामदेवशास्त्री यांची भेट घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. त्यानुसार धनंजय देशमुख आणि वैभवी देशमुख यांनी मस्साजोगच्या काही ग्रामस्थांसह नामदेवशास्त्री यांची आज भेट घेत त्यांना आपली बाजू सांगितली. यावेळी धनंजय देशमुख म्हणाले की, माझे भाऊ संतोष देशमुख यांचे काय चुकले? देशमुख कुटुंबियाने कधी जातीयवाद केला नाही. आरोपींना पाठीशी घालणारेच जातीयवाद निर्माण करत आहेत. माझ्या भावाने एका दलित बांधवाला वाचवण्याचा प्रयत्न केला. आमच्या कुटुंबियांचा कधीच कोणासोबत वाद झाला नाही. माझ्या भावाला अवादा कंपनीच्या सुरक्षारक्षकाने कॉल केला. त्या दलित बांधवाची ॲट्रोसिटीची तक्रार घेतली असती तर संतोष देशमुख यांचा खून झाला नसता. शहानिशा केल्याशिवाय बोलणे उचित नाही. आरोपींवर आतापर्यंत अनेक गुन्हे दाखल झाले आहेत. आरोपींची मानसिकता तपासण्याची गरज आहे. राजकीय नेते, संप्रदायाचे लोक, सामाजिक कार्यकर्ते आमच्यासोबत आहेत. ते न्यायाची बाजू घेत आहेत. त्यांना जातीयवादी म्हणू नका. नाही तर ते कधीच न्यायाची भूमिका घेणार नाहीत. न्याय मागणाऱ्या लोकप्रतिनिधींना चुकीचे ठरवू नका, अशी तुम्हाला विनंती आहे.
धनंजय देशमुखांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर महंत नामदेवशास्त्री म्हणाले की, आरोपींची खरी पार्श्वभूमी काय आहे, त्यांच्यावर गुन्हे किती आहे याबाबत धनंजय देशमुख यांनी मला पुरावे दाखवले. जातीयवाद न करता खऱ्या आरोपीला शिक्षा झाली पाहिजे, असे मी भगवान गडाच्या या गादीवर बसून सांगतो. तुम्हाला शब्द देतो की, भगवानगड आरोपीच्या पाठीमागे नाही. भगवानगड कायम देशमुख कुटुंबाच्या पाठीशी उभा राहील. कदाचित माझ्या बोलण्याचा गैरसमज झाला असावा. माझी महाराष्ट्राला विनंती आहे की, या प्रकरणाला जातीयवादाचा रंग देऊ नका.
संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख म्हणाली की, मी तुमच्यापेक्षा फार लहान आहे. माझ्या वडिलांच्या केवळ तीन अस्थी उरल्या आहेत. त्यांना हत्येपूर्वी ज्या पद्धतीने मारहाण झाली त्याचे फोटोही आम्हाला पाहवत नाहीत. तुम्ही यावरून समजू शकता की आमची मानसिकता काय असेल? त्या आरोपींनी माझ्या वडिलांची हत्या कशी केली हे तुम्ही जाणून घेतले पाहिजे होते. आमची बाजू तुम्ही समजून घेतली पाहिजे होती. त्यानंतरच तुम्ही वक्तव्य केले पाहिजे होते. आरोपी खंडणी मागायला आले आणि त्यांनी दलित बांधवाला मारहाण केली म्हणून माझ्या वडिलांनी त्यांना अडवले. ज्यांना आरोपींची पाठराखण करायची आहे तेच जातीयवाद करत आहेत. माझ्या वडिलांनी कधीही जातीयवाद केला नाही. आम्हाला न्याय मिळायला हवा.
देशमुख कुटुंबाने पुरावे दिले! नामदेव शास्त्रींची अखेर माघार
